हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथे स्वस्त धान्य दुकानातून माल मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी होऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करीत एकाने जिल्हा कचेरीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न सोमवारी (दि. ०३ ) दुपारी दीडच्या सुमारास केला.
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील काही नागरिकांनी रेशन दुकानातून लाभार्थ्यांना अन्नधान्य व रॉकेल मिळत नसल्याची तक्रार केली होती. स्वस्त धान्य दुकानदारच माल हडप करीत असल्याने त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र दुकानदार भिकूलाल बाहेती यांने तक्रारदार हे मला त्रास देत असून त्यामुळे दुकान चालविणेच अवघड झाल्याचे नमूद करीत लेखी राजीनामा तहसील प्रशासनाकडे सादर केला होता.
दरम्यान, या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठीही पथक नेमले गेले होते. या पथकाने गावात जावून लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत चौकशी केली. या चौकशीचा अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वीच आज नियमानुसार धान्य मिळावे, या मागणीसाठी जिल्हा कचेरीच्या गेटसमोर वैजनाथ पावडे व गणेश ढोणे हे आत्मदहन करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होती. जिल्हा कचेरीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवेशद्वारानजीकच पोलीस चौकी आहे. तेथील आरडाओरड ऐकून पोलीस बाहेर आले. एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे आणि दुसरा आगपेटीतून घेऊन उभा असल्याचे पाहताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.