हिंगोली : तालुक्यातील डिग्रसफाटा येथील सत्यगणपती मंदिरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली. तसेच या परिसराती एका फार्म हाऊसवरसुद्धा चोरट्यांनी डल्ला मारून एक लाखांचा मुद्देमाल पळविला.
तालुक्यातील ग्रामीण ठाणे हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. २३ जुलै रोजी डिग्रसफाटा परिसरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सत्यगणपती मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली. तसेच डिग्रसफाटा परिसरातीलच अॅड. मनीष साकळे यांच्या फार्म हाऊसवर चोरट्यांनी डल्ला मारत जवळपास एक लाखाचा मुद्देमाल पळवला.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच डिग्रसक-हाळे येथील बीट जमादार पोकळे, पोटे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दानपेटीत किती रक्कम होती याचा मात्र हिशोब लावण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या गणपती मंदिरातील दानपेटी यापूर्वीही फोडण्यात आली होती अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.