हिंगोली : जमीनमालक असल्याचे भासवून इसारपावती तयार करून एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शहर ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहरातील पलटन येथील शमशेरखाँन इनायतुल्लाखाँन यांची तिघा आरोपींनी संगणमत करून ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत आर्थिक फसवणूक केली. शमशेरखाँन यांना आरोपींनी बनावट इसारपावती तयार करून सय्यद ईसा महेबुब यांच्या नावावर जमीन नसताना जमीनमालक असल्याचे भासविले. तसेच शमशेरखाँन यांच्याकडून इसारपावतीपोटी १ लाख २६ हजार रूपये घेतले. परंतु शमशेरखाँन यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली.
परंतु, सदर रक्कम देण्यास आरोपी सय्यद बिलाल हाश्मी, सय्यद अजीस उर्फ मुन्ना व सय्यद इसा महेबुब यांनी संगणत करून फिर्यादी शमशेरखाँन यांची दमदाटी केली. तसेच ‘तु आमचे काही करू शकत नाहीस, तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणत आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शमशेरखाँन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद हाश्मी, सय्यद अजीस व सय्यद इसा या तिघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि कांबळे करीत आहेत.