हिंगोली : तालुक्यातील कारवाडी, रघुनंदननगर येथील युवतीने एका युवकाच्या सततच्या त्रासास कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.७) घडली. या प्रकरणी मृत युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस जबाबदार तिघांविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाडी भागातील रघुनंदन नगर येथे श्रुतुजा बालाजी सुर्यवंशी (१९) या युवतीने काल राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पापू उर्फ निवरोद्दीन फकरोद्दीन भवरी रा. खुशालनगर हा ऋतुजाचा नेहमी पाठलाग करीत असे. तसेच ‘तु माझ्या सोबत चल नाहीतर मी आत्महत्या करेल’ असे म्हणत तिला दोन वर्षांपासून त्रास देत असे. याबाबत श्रुतुजाच्या आई वडिलांनी पापूचे आईवडील तस्लीमा व फकरोद्दीन भवरी यांना भेटून सारा प्रकार सांगितला. यावर त्यांनी श्रुतुजाच्या आई व वडीलाचे म्हणे ऐकून न घेता त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. यानंतर वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळुन ऋतुजाने आत्महत्या केली.
या प्रकरणी लताबाई सुर्यवंशी यांनी आज पापू उर्फ निवरोद्दीन फकरोद्दीन भवरी, तस्लीमा फकरोद्दीन भवरी, फकरोद्दीन भवरी यांच्या विरोधात श्रुतुजाच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची फिर्याद दिली. यावरून भवरी कुटुंबीयांविरोधात आत्महत्येस कारणीभूत व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोनि जगदीश भंडरवार यांनी दिली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदणे करीत आहेत.