हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेत ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी शिवसेनेचे गणाजी मुकिंदा बेले व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मनीष शामराव आखरे यांची बिनविरोध निवड झाली.
हिंगोली जि.प.त शिवसेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १0, भाजप ११ व ३ अपक्ष असे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या सागरबाई भिसे यांना प्रशासनाने सभेची नोटीस बजावली असली तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी अनर्ह ठरविल्याच्या आदेशाला स्थगिती नसल्याने त्यांची नोटीस रद्द केली होती. त्यामुळे ५२ ऐवजी ५१ सदस्यांनाच मतदानाचा अधिकार होता.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वीच हिंगोली जिल्हा परिषदेत सत्तेचा हा पॅटर्न अस्तित्वात होता. हिंगोलीचाच पॅटर्न राज्यात स्वीकारल्याचे गमतीने म्हटले जाते. यावेळीही हा पॅटर्न कायम राहिला. जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण प्रवर्गास सुटले होते. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे हे पद गेले. या प्रवर्गातील सेनेकडे एकमेव गणाजी बेले हेच सदस्य असल्याने अपेक्षेप्रमाणे त्यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते. यशोदा दराडे व मनीष आखरे यांच्यात स्पर्धा होती. अखेर आखरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आता सभापतीपदांची निवड होणे बाकी आहे. काँग्रेसला २, राष्ट्रवादी १ व सेनेला एक पद मिळणार आहे.