जिल्हा रुग्णालयात दररोजची ओपीडी ३०० ते ३५० एवढी आहे. मध्यंतरी कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले होते, परंतु आता कोरोना आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या रुग्णालयात डायलेसीस ४ मशीन, सोनोग्राफी १, अस्थिरोग रुग्णांसाठी सीआरएम मशीन तर कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी बायपॅप मशीन आहे.
जिल्हा रुग्णालयातील मशीन सुस्थितीत
हिंगोली जिल्ह्यासाठी ‘एमआरआय’ मशीनचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी दिला होता. हिंगोली जिल्ह्याची गरज लक्षात घेता तो शासनाने मंजूरही केला आहे. सदरील मशीन लवकरच येणार आहे. सध्या रुग्णालयात दोन सिटी स्कॅन असून इतर मशीनही सुस्थितीत आहेत.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी,
जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
दोन सिटी स्कॅन मशीन असूनही रुग्णांचे हाल
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन सिटी स्कॅन मशीन असून रुग्णांना अनेकवेळा ताटकळत बसण्याची वेळ येते. सिटी स्कॅन विभागासमोर वेळेेचा कुठेही उल्लेख केलेला नाही. केव्हाही सिटी स्कॅन विभाग उघडतो. बुधवारी तर सायंक़ाळचे पाच वाजले तरी सिटी स्कॅन उघडलेला नसल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना बाहेरच थांबावे लागले.
रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव
जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांबरोबर इतर रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दररोजची ओपीडी ही तीनशे ते साडेतीनशेच्या घरात आहे. अशा स्थितीत स्वच्छता करणे आवश्यक असताना परिसरात मात्र स्वच्छता दिसून येत नाही. स्वच्छता मोहिमेचा अभाव दिसून येत आहे.
अजून एक सिटी स्कॅन मशीनची गरज
हिंगोली जिल्ह्याकरिता सद्यस्थितीत दोनच मशीन आहेत. कधी-कधी या दोन सिटी स्कॅन मशीनमधून एखादी मशीन बंद पडते. त्यामुळे रुग्णांना अनेकवेळा नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते. शासनाने रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हिंगोली जिल्हा रुग्णालयात दोन सिटी स्कॅन मशीन व्यतिरिक्त मशीन द्यावी.
- महेंद्र बलखंडे,हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात एमआरआय मशीन येणार आहे, येणार आहे हेच ऐकत आहोत. परंतु, कोणीही यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही. सदरील मशीन येेथे नसल्यामुळे रुग्णांना खासगी वाहन करून नांदेड, औरंगाबाद, जालना येथे जावे लागते. विशेष म्हणजे जाण्या-येण्याचा तसेच एमआरआय तपासणीचा खर्च पडवडेनासा झाला आहे. मशीन लवकरात लवकर आणावी.
- हरीष पुंडगे, हिंगोली
हिंगोली जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन वर्षभरापासून नाही. त्यामुळे रुग्णांना इतर जिल्ह्यात जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयाने या मशीनसाठी प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगण्यात येते. परंतु, अजूनही एमआरआय मशीन जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाली नाही. आजमितीस रुग्णांना इतर जिल्ह्यात जाऊन ‘एमआरआय’ करुन घ्यावे लागत आहे.
- रवी हेरे, जवळापांचाळ