हिंगोली : फॅन्सी नंबरचे वेड अनेकांना असते. यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची वाहनधारकांची तयारी असते. हिंगोली जिल्ह्यात ४१४१, ११७७, ९१९१ या नंबर्सला मागणी असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले.
उपप्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ४१४१ (किंमत १५ हजार), ११७७ (किंमत २२ हजार ५००), ९१९१ (किंमत १५ हजार) आहे. तर सर्वात जास्त किंमत १ नंबरसाठी ३ लाख, ९९ नंबरसाठी १ लाख ५० हजार तर ७७७ नंबरसाठी ७० हजार रुपये मोजावे लागतात. फॅन्सी नंबरसाठी वाहनधारक वाट्टेल ती किंमत मोजण्यासाठी तयार असतात. यासाठी उपप्रादेशिक कार्यालयात कितीही चकरा माराव्या लागल्या तरी चालेल पण नंबर मिळवूनच घेऊ असा त्यांचा हट्ट असतो. एकदाचा नंबर मिळाला की, वाहनधारक आनंदी होतात. कोरोना काळातही अनेकांनी फॅन्सी नंबरसाठी आटोकाट प्रयत्न करुन नंबर हस्तगत करुन गाडीवर लावल्याचे पहायला मिळत आहे. जास्त किमतीचा नंबर मात्र अजून गेला नाही, असेही आरटीओ कार्यालयाने सांगितले.
फॅन्सी नंबरमधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला २०१९ मध्ये २३ लाख १३ हजार ५०० रुपये, २०२० मध्ये २६ लाख २६ हजार ३०० रुपये तर २०२१ च्या मे महिन्यापर्यंत ११ लाख ३५ हजार ५०० रुपयांची कमाई झाली आहे.
प्रतिक्रिया
फॅन्सी नंबरसाठी वाहनधारकांनी आरटीओ कार्यालयात येणे आवश्यक आहे. यासाठी जे काही शुल्क असते ते नियमानुसार भरावे लागते. त्यानंतर जो नंबर वाहनासाठी हवा आहे तो सादर करणेही आवश्यक आहे. सर्व कार्यालयीन सोपस्कार झाल्यानंतर नंबर वाहनधारकांना दिला जातो.
-अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली
... तर नंबरसाठी होतो लिलाव
फॅन्सी नंबरसाठी उपप्रादेशिक कार्यालय लिलाव करत नाही. वाहनधारकांनी फॅन्सी नंबरसाठी लिलावाची मागणी केली तरच उपप्रादेशिक कार्यालय हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत फॅन्सी नंबरचा लिलाव करते. मागणी करणारे वाहनधारकही यावेळी उपस्थित असतात. परंतु हा लिलाव जास्त करुन मोठ्या शहरातच केला जातो.
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सळो की पळो करुन सोडले आहे. पण ‘हौसेला मोल नसते’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. कोरोना काळातही अनेकांनी फॅन्सी नंबरसाठी जीवाचे रान करुन मनपसंत नंबर हस्तगत करुन वाहनावर लावला आहे. दुसरीकडे अनेक वाहनचालकांनी फॅन्सी नंबरसाठी आटोकाट प्रयत्न केला होता. परंतु, शेवटी-शेवटी त्यांच्या पदरात निराशेशिवाय काहीही पडले नाही. साधा नंबर घेऊन त्यांनी वाहनावर लावला आहे.
या तीन नंबरला सर्वाधिक मागणी
४१४१-१५ हजार रुपये
११७७- २२ हजार ५०० रुपये
९१९१- १५ हजार रुपये
या नंबरचा रेट सर्वात जास्त
१- ३ लाख रुपये
९९ - १ लाख ५० हजार रुपये
७७७ - ७० हजार रुपये
आरटीओ कार्यालयाची कमाई
२०१९- २३,१३,५००
२०२०- २६, २६, ३००
२०२१- ११, ३५, ५००