हिंगोली: मानवाच्या मुख्य गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा अशा तीन आहेत. पण आता त्यात चौथी गरज म्हणून मोबाईललची भर पडली आहे. गतवर्षभरात मोबाईल सांभाळण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे ७१ जणांना मोबाईलपासून दूृर रहावे लागले.
मोबाईल हरवण्याचे आणि चोरी जाण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आठवडी बाजार असते. २०२० मध्ये हिंगोली शहरातील ७१ जणांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ८, एप्रिल महिन्यात ३, मे महिन्यात १, जून महिन्यात २, जुलै महिन्यात १, ऑगस्ट महिन्यात ५, सप्टेंबर महिन्यात ४, ऑक्टोबर महिन्यात ९, नोव्हेंबर महिन्यात एकही नाही आणि डिसेंबर महिन्यात ५ अशा ७१ मोबाईल हरवल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. परंतु, मोबाईल किती सापडले याची मात्र नोंद प्राप्त झाली नाही.
गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळा
गर्दीचे ठिकाण हे चोरट्यांसाठी चांगले असते. गत काही वर्षापासून काही जण शर्टच्या खिशात मोबाईल ठेवतात. हे धोकादायक असून चोरट्यांसाठी सोयीचे असते. एखाद्या व्यक्तीने मोबाईल शर्टच्या खिशात ठेवल्याचे चोरटा हेरुन असतो. गर्दीच्या ठिकाणी व्यक्ती पोहोचला की चोरटा त्यावर हात मारुन तो मोबाईल अलगतपणे लंपास करतो. मोबाईल खिशात नाही समजल्यानंतर शेवटी पर्याय म्हणून पोलीस ठाणे गाठतो आणि तक्रार दाखल करतो. तेव्हा गर्दीचे ठिकाण टाळा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
महागामोलाचा मोबाईल घेतल्यानंतर तो सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. मोबाईल हा शर्टच्या वरच्या खिशात ठेवण्याऐवजी पँटच्या खिशात सुरक्षित ठेवावा. महागामोलाच्या वस्तुची काळजी घ्यावी.
-पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर