हिंगोली : शहरातील महावीरनगरमध्ये सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास साडेचार ते पाच फुटांचा कोब्रा नाग सर्पमित्राने मोठ्या हिमतीने पकडून मंगळवारी वनाधिकाऱ्यांच्या संमतीने जंगलात सोडला. या प्रकारामुळे महावीर नगरातील नागरिकांची मात्र झोप उडाली होती.
१९ जुलै रोजी रात्रीला शहरात जोरदार पाऊस झाला. यानंतर रात्री ११.३० वाजता महावीरनगरमध्ये साप निघाल्याने संजू सोळंके यांनी सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर, ओम जाधव व अभय इंगळे यांना फोन केला. उशीर न लावता तिन्ही सर्पमित्र धावले. तेथील सर्व भाग पिंजून काढत सर्पमित्रांनी कोब्रा नागाला प्लास्टीकच्या बरणीत बंद केले.
महिनाभरापूर्वीही असाच पाच फुटाचा कोब्रा शहरात सापडला होता. उंदीर, घुस व इतर छोट्या प्राण्यांना भक्ष करण्यासाठी साप बिळातून बाहेर येत आहेत. तेव्हा नागरिकांनी कोणत्याही सापांना मारु नये, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. .
साप माणसाच्या हालचाली ओळखतो...
साप स्वत:हून कधीही दंश करत नाही. त्याला मारण्याचा कोणी प्रयत्न केला तर स्वत:च्या बचावासाठी तो प्रतिकार करतो. तेव्हा नागरिकांनी सापाला मारण्याचा प्रयत्न करु नये. बिळातून बाहेर निघालेला साप विषारी आहे की बिनविषारी याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. काहीजण आकशेपोटी सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु, तो प्रयत्न जीवावर उठण्याची शक्यता असते.
फोटो १६