हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी तब्बल सात वर्षांनतर जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात कमाल तापमान ३४ अंशावर गेले होते. त्यामुळे उन्हाळ्यासारखी स्थिती जुलै महिन्यातही अनुभवायास मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्य सांभाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात बदल झाल्याचे पहावयास मिळत आहेत. जुलै महिना सुरू झाला तरी तापमानात कमालीची वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. सात वर्षांपूर्वी ९ जुलै २०१५ मध्ये जिल्ह्याचे तापमान ३४ अंशावर गेले होेते. त्यानंतर ९ जुलै २०१६ मध्ये कमाल तापमान २७ अंश नोंदविले गेले होते. २०१७ मध्ये मात्र यात वाढ होत तापमान ३३ अंश झाले होते. त्यानंतर मात्र सातत्याने जुलै महिन्यात तापमानात घट झाल्याचे पहावयास मिळाले. आता तब्बल सात वर्षानंतर पुन्हा जिल्ह्याचे जुलै महिन्यातील तापमान ३४ अंशावर गेले आहे. १ ते ८ जुलै २०२१ या कालावधीत ३ व ८ जुलै वगळता कमाल तापमान ३४ अंशावर गेल्याचे पहावयास मिळाले. सध्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पाऊस होत असल्याने उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यातही तापमान जास्त राहत असल्याने आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
सरासरी तापमानात सहा अंशाची वाढ
जिल्ह्यात जुलै महिन्यात दरवर्षी सरासरी २७ ते २८ अंश कमाल तापमान असते. यावर्षी मात्र जुलै महिन्यातील तापमान ३४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे सरासरी तापमानात ६ अंशाची वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसामुळे ८ जुलै रोजी तापमान ३० अंशावर आले होते. त्यामुळे थोडासा गारवा जाणवत होता.
जिल्ह्यात पावसाची शक्यता
जिल्ह्यात जून महिन्यात काही दिवस चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. पिके हातची जातात की काय असे दिसत असतानाच पुन्हा एकदा पाऊस बरसला. दरम्यान, जिल्ह्यात ९ ते १३ जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.
मान्सून होतोय सक्रिय
मागील आठवड्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंतही सूर्य आग ओकत होता. त्यामुळे रात्री १ वाजेपर्यंतही चांगलाच उकाडा जाणवत होता. मात्र मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून पुढचे काही दिवस पावसाचे असणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे वातावरणात वाढलेला उकाडा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विषम तापमानात डोके दुखणे, डिहायड्रेशन होण्याचा त्रास लहान मुलांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्यास देणे, पातळ पदार्थ खाण्यास देणे आवश्यक आहे. तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.
- डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ, हिंगोली
असे मोडले जुलैचे रेकॉर्ड
२०१५ - ३४
२०१६ - २७
२०१७ - ३३
२०१८ -२८
२०१९ - ३२
२०२० -३२
२०२१ - ३४