हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपानसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी २१ मे रोजी अवकाळीचा तडाखा बसला. वादळी वारा, मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात झाडे उन्मळून पडली, अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले, आंबा, पपईसह फळबागांनाही फटका बसला.
मागील वीस दिवसांपासून अवकाळी संकट पाठ सोडत नसून, यात शेतीपिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान होत आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या अवकाळीत शेतकऱ्यांनी शेतात काढून टाकलेल्या हळदीवर अवकाळीने पाणी फेरले. त्यामुळे फटका बसला. १९ मे रोजी रात्री सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपानसह म्हाळसापूर, कवरदडी, कवठा, कोंडवाडा, खांबा सिनगी, कहाकर भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर, २० मे रोजीही काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर, २१ मे रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या दरम्यान, वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने, गावातील ज्ञानेश्वर विद्यालयासमोरील एक लिंबाचे झाड कोसळले, तसेच रस्त्यालगतचे एक बाभळीचे झाडही कोसळले, तसेच शेतशिवारात आंब्याचा महाकाय वृक्ष उन्मळून पडला, तसेच काही घरांवरील पत्रेही उडाले. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. सुमारे अर्धा तास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली होती.
विद्युत खांब वाकले, ताराही तुटल्या...वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने गावालगत, तसेच शेतशिवारातील विद्युत खांब वाकले, तसेच काही ठिकाणच्या ताराही तुटल्या. त्यामुळे वरुड चक्रपानसह परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. या अवकाळी संकटात महावितरणचेही प्रचंड नुकसान होत आहे. तार तुटल्याची माहिती महावितरण कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.