आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : 'तुझे वडील आमच्या ताब्यात आहेत, तुझ्याकडे असलेले सोने दे किंवा दोन कोटी रुपये दे. तरच ते जिवंत मिळतील' अशी धमकी देत शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी बाळापुर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत काही तासातच तेलंगणा सीमेवरून अपहत व्यापाऱ्याची सुटका केली आहे.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील तंबाखूचे व्यापारी शेख कादर मंगळवारी ( दि. 25) सकाळी शेवाळा रोड वरील बांधकामाची पाहणीसाठी गेले. मात्र, त्यानंतर कादर घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला. ते कोठेच सापडले नसल्याने नातेवाईकांनी बाळापुर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या मोबाईलच्या सिग्नलवरून हदगाव, उमरी या ठिकाणी पोलीस व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाही.
दरम्यान, बुधवारी (दि. 26) कादर यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलास शेखयूम शेख कादर याला फोन आला. यावेळी अनोळखी व्यक्तीने, 'तुझ्याकडील सोने किंवा दोन कोटी रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या वडिलांचे प्रेत घेऊन जा.' अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी तपासासाठी पथके विविध ठिकाणी रवाना केली. प्राथमिक माहितीनुसार ठाणेदार गणेश राहिरे, जमादार संजय मारके, पोना प्रशांत शिंदे, भालेराव यांचे पथक देगलूरकडे रवाना झाले. मात्र सायबर ब्रांचने अपहरणकर्ते व्यापाऱ्यासह तेलंगणा सीमेवर असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून पथकाने उमरी तालुक्यातील हुंडा गावाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी आरोपींना पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात आले. दरम्यान, आरोपींच्या संशयास्पद हालचालीवरून ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी धाडस करत आरोपींच्या ताब्यातून व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका केली. याचवेळी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र, अपहरणकर्ते पळून जाण्यास यशस्वी झाले.