हिंगोली : येथील बाजार समितीचे मार्केट यार्डात हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सात दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून सुरू झाले. तब्बल सात हजार क्विंटल हळदीची आवक झाली असून, काट्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. शेतकऱ्यांना भाववाढीची आशा असताना क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी भाव घसरल्याने निराशा झाली.
मार्केट यार्डातील शेडमध्ये व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्प्या लावण्यात आल्यामुळे जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे १२ मेपासून हळदीचे बीट बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान व्यापाऱ्यांना सूचना करीत माल इतरत्र हलविल्यानंतर २० मेपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. हळदीचे मोजमाप लवकर व्हावे यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील शेतकरी १८ मेपासूनच हळद घेऊन हिंगोलीत दाखल होत होते. रविवारी रात्री १० वाजेपर्यंत जवळपास २०० च्यावर वाहनांची रांग लागली होती. तर सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे १०० वाहने दाखल झाली. हळदीचे मोजमाप करण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत.
दुपारी ११ वाजेच्या सुमारास बीट पुकारण्यास सुरुवात झाली. जवळपास २ हजार ५१५ क्विंटल हळदीची बीट करण्यात आली. यात १४ हजार ३०० ते १६ हजार ८०० रुपयांदरम्यान हळदीला भाव मिळाला. गत आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.