रमेश वाबळे, हिंगोली: तालुक्यातील बेलवाडी भागात कयाधू नदीच्या पात्रातून तब्बल १ हजार २०० ब्रास वाळूचा उपसा करण्यात आल्याचे महसूल पथकाने २४ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत निदर्शनास आले. वाळूचा उपसा करणाऱ्यांकडून ३ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कारवाईदरम्यान ट्रॅक्टर, टिप्परसह एक जेसीबी अशी १६ वाहने, वाळूसाठा जप्त केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या वतीने वाळू माफियांविरुद्ध धडक २४ फेब्रुवारीपासून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी पथकाने हिंगोली तालुक्यातील बेलवाडी भागात वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. तसेच या परिसरातून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पात्रातून जवळपास १२०० ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पथकाने चौकशी केल्यानंतर दहा ते बारा नावे समोर आली असून, त्यांच्याकडून सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याच दिवशी हिंगोली शहरात वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.
याशिवाय सेनगाव तालुक्यातील खुडज भागातून अवैधरीत्या मुरूम उत्खनन करणारी एक जेसीबी व एक ट्रॅक्टर पकडण्यात आले. तर या ठिकाणाहून माफिया तीन वाहने पळवून नेण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी नर्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, वाहन मालकांकडून १३ लाखांचा दंड लावण्यात आला आहे. तसेच नर्सी टी-पाॅइंटवरून ३ टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, या वाहनमालकांविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी रोजीही महसूलच्या पथकाने वाळू, मुरूम उत्खनन होणाऱ्या ठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली. यादरम्यान दुपारी १:३० वाजेच्या सुमारास नर्सी टी-पाॅइंट येथून खडी वाहतूक करणारे एक टिप्पर पकडण्यात आले.
महसूल पथक ‘ॲक्शनमोडवर’...
बेलवाडीनजीक कयाधू नदीपत्रातून तब्बल १२०० ब्रास वाळचा उपसा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल पथक ‘ॲक्शनमोडवर’ आले असून, दोन दिवसांपासून वाळू माफिया, गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांविरूद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. १२०० ब्रास वाळूचे उत्खनन करणाऱ्यांमध्ये पसराम गणपती मांडगे, श्यामराव बापूराव मांडगे, रमेश कडुजी मांडगे, शंकर कडुजी मांडगे, सोनाजी मांडगे, रामेश्वर विश्वनाथ मांडगे, संतोष राजाराम मांडगे, जिजिबा बाबाजी मांडगे, संतोष राजाराम मांडगे व इतर काही जणांची नावे पुढे आल्याचे महसूल विभागाने सांगितले.