हिंगोली : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तावर कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्डचे मानधन मागील दोन महिन्यांपासून थकले आहे, तसेच होमगार्डना नियमित कामही उपलब्ध होत नसल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हाभरात ६४८ होमगार्ड कार्यरत आहेत. त्यांना ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह विविध धार्मिक सण, उत्सवाच्या वेळी बंदोबस्तासाठी बोलावले जाते. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड बंदोबस्तामध्ये सहभागी होतात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून होमगार्डचे मानधन थकले आहे. त्यातच ५० वर्षे पूर्ण झालेल्या होमगार्डना बंदोबस्तासाठी बोलावले जात नसल्याचा आरोप होत आहे. बंदोबस्तावर कर्तव्य बजावल्यासच मानधन जमा होते. मात्र, कोरोनाच्या काळात काही दिवसच काम मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काही होमगार्ड जवानांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाच्या काळात अनेकांना कर्तव्य बजावण्याची संधी मिळाली नाही. परिणामी, मानधन मिळाले नसल्याने आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया होमगार्डमधून व्यक्त होत आहेत. होमगार्डचे थकीत मानधन लवकर देऊन ५० वर्षांवरील होमगार्डनाही काम उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी होमगार्डमधून होत आहे.
महिन्याला किती मिळते काम
पोलिसांच्या खाद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डना काम उपलब्ध झाल्यास दर दिवशी ६७० रुपये मानधनापोटी दिले जातात. यामध्ये उपाहार भत्ता म्हणून १०० रुपये, तर कर्तव्य भत्ता म्हणून ५७० रुपये दिले जातात. महिनाभर बंदोबस्त मिळाला, तर २० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते.
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करत आहेत. काम केल्याचे मानधन लवकरात लवकर अदा करावे, तसेच ५० वर्षे वय झालेल्या होमगार्डनाही यापुढे काम उपलब्ध करून द्यावे.
-कैलास चाैतमल होमगार्ड
कोरोनाच्या काळात होमगार्डने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, २५ ते ३० वर्षे सेवा बजावूनही वयाची ५० वर्षे झाल्याने बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली.
-कविचंद सुरोशे, होमगार्ड
अनेक वर्षांपासून कर्तव्य बजावत आहे. मात्र, कोरोनामुळे ५० वर्षांवरील होमगार्डना बंदोबस्तासाठी बोलावले जात नाही. पोलीस दलातही ५० वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी आहेत. त्यानुसार होमगार्डनाही बंदोबस्त द्यावा.
-बळीराम बाभूळकर,
होमगार्ड
जिल्ह्यातील होमगार्डचे डिसेंबर, जानेवारी महिन्यांचे मानधन देणे बाकी आहे. यासाठी महासमादेशकांकडे मानधनासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. मानधन लवकर मिळेल.
-यशवंत काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक