हिंगोली : ग्रामपंचायतींना आता थेट निधी उपलब्ध करून दिला असून ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचाचे काम वाढलेले आहे. यासाठी सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ केली असली तरी, सदस्यांना मात्र कोणतेही मानधन नसल्याने चहापानवर समाधान मानावे लागत आहे. सदस्यांनाही मानधन देण्यात यावे, अशी मागणी आता नवनिर्वाचित सदस्यांकडून हाेत आहे.
केंद्रासह राज्यशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात आहे. गावांच्या विकासात सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचेही महत्व आहे. विविध विकास कामाच्या बैठकांना सदस्यांनाही पाचारण केले जात आहे. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी सदस्यांवरही आली आहे. सरपंच, उपसरपंचाच्या कामाचा व्याप लक्षात घेता, त्यांना गावांच्या लोकसंख्येनुसार मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र हे मानधनही तोकडे असल्याचा आरोप होत आहे. सरपंच, उपसरपंचांना मानधन दिले जात असले तरी, सदस्यांना मात्र बैठक भत्ता व चहापाणी वगळता इतर कोणतेही मानधन दिले जात नाही. दरम्यान जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. सध्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरू असून आणखी दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आतापयर्यंत ३८२ च्या वर ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या असून अनेकांनी गावकारभारी म्हणून काम सुरू केले आहे.
प्रतिक्रीया
गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सदस्यांना देखील वार्डमधील कामासाठी निधीची आवश्यकता आहे. तसेच त्यांना सरपंच, उपसरपंचाप्रमाणे मानधन देण्याची तरतूद शासनाने करणे गरजेचे आहे.
- राजेश पाटील इंगोले, सरपंच, कुरूंदा (ता. वसमत)
गाव विकासासाठी सरपंच हा महत्वाचा घटक आहे. सरपंचाना शासनातर्फे दिले जाणारे मानधन तुटपुंजे आहे. शासनाने सरपंचाच्या मानधनात वाढ करून ग्रा.प. सदस्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घ्यावा.
- रघुनाथ गुहाडे,
सरपंच, पोत्रा (ता. कळमनुरी)
सरपंच, उपसरपंचाप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य हे देखील गावविकासासाठी नेहमीचं प्रयत्नशिल असतात. शासनाकडून सरपंच, उपसरपंचांनाच मानधन दिले जाते. यापुढे ग्रा.पं. सदस्यांनाही मानधन मिळावे.
- शोभाबाई नायक सरपंच, सवना (ता. सेनगाव)