या माध्यमातून शहरामध्ये विविध बचावात्मक उपाययोजना सुरू आहेत. यामध्ये शहरामध्ये हायपोक्लोराईडद्वारे फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे, हॉटस्पॉट बॅरिकेडिंगद्वारे प्रतिबंधित करणे, कोविड सेंटर, संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे, तेथील दैनंदिन स्वच्छता करणे, त्या ठिकाणचा दैनंदिन निर्माण हाेणारा कचरा डेडिकेटेड वाहनाद्वारे विलगीकरण संकलित करणे, पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे काँटॅक्ट ट्रेसिंग करून त्यांना संस्थात्मक विलगीकरण करणे, आरोग्य विभागाच्या साहाय्याने शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांची दैनंदिन आरटीपीसीआर, अँटिजन टेस्ट करणे, दैनंदिन लसीकरण करणे, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे, शहरातील भाजीमंडईत नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून पाच ठिकाणी भाजीमंडई लावावी तसेच फळ व भाजी विक्रेत्यांना विविध सूचना हिंगोली न.प.कडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे पाॅझिटिव्ह रुग्ण अत्यावस्थ होऊन त्याचा मृत्यू झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मृत रुग्णाचे मृतदेह आरोग्य विभागामार्फत अंत्यविधी करण्याकरिता न.प. पथकाकडे सुपूर्द करण्यात येतो. यानंतर मृत रुग्णाला प्रत्यक्ष ठिकाणाहून नियोजित ठिकाणावर नेण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सुरक्षात्मक साहित्याचा वापर करून करण्यात येते. मृत रुग्णाचे अंत्यसंस्कार विधी करण्यास नगर परिषदेमार्फत शहरातील रिसाला बाजार येथील स्मशानभूमीमध्ये संपूर्ण नियोजन करण्यात आले असून, मृत रुग्णाचे अंत्यसंस्कार करण्याकरिता न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मृत रुग्णाचे अंत्यविधी करण्याच्या अनुषंगाने अग्निडाग देण्याकरिता मृताचे नातेवाइकास संपूर्ण सुरक्षात्मक साहित्य देऊन पाचारण करण्यात येते. त्यानुसार मृताच्या नातेवाइकाने मृतदेहास अग्निडाग दिल्यानंतर पुढील संपूर्ण क्रिया पार पडेपर्यंत सदर ठिकाणी न.प. स्वच्छता कर्मचारी तैनात असतात. किंबहूना काही वेळेस अपवादात्मक परिस्थितीमध्ये मृत रुग्णांचे नातेवाईक भीतीपोटी मृतदेहास अग्निडाग देण्यास नकार देतात. अशा वेळी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी हे कर्तव्यापोटी स्वत: मृतदेहास अग्निडाग देण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे एका प्रकरणात मयत रुग्णाच्या मृतदेहास अग्निडाग देण्यास नकार दिल्यामुळे नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक आर. व्ही. बांगर यांनीसुद्धा संसर्गाची भीती न जुमानता कर्तव्य म्हणून स्वत: अग्निडाग देण्याचे काम केले आहे. मृत रुग्णाच्या अंत्यविधीस प्रक्रिया पूर्ण करण्याकामी नगर परिषदेकडून संबंधित नातेवाइकाकडून कोणत्याची प्रकारचे शुल्क न आकारता नि:शुल्क सर्व प्रक्रिया करण्यात येते. त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आजपर्यंत एकूण २७ मृत रुग्णांचे अंत्यविधी नगर परिषदेमार्फत करण्यात आलेले आहे. याकरिता आजपर्यंत एकूण १५६ क्विंटल लाकूड, ७८०० गोवऱ्या व १८० लिटर डिझेल तसेच सुरक्षात्मक साहित्यामध्ये १३० पीपीई कीट, १३० हँडग्लोव्हज, २७० एन-९५ मास्क, २७ बॉडीकव्हर, आदी अत्यावश्यक साहित्य नगर परिषदेने स्वत:च्या निधीमधून खर्च केलेला आहे. यामुळे स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याची जाण ठेवून जबाबदारीने सेवा देत असलेल्या नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासह त्यांच्या कार्यास उत्तेजन देण्यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण व मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या हस्ते स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यामध्ये स्वच्छता निरीक्षक आर. व्ही. बांगर, दिनेश शर्मा, माधव सुक्ते, अनिल गालफाडे, काशिनाथ लगड, नवनाथ ठोंबरे, चेतन भुजवणे, रवी गायकवाड, दिनकर शिंदे, आकाश आठवले आणि रिसाला बाजार येथील परंपरागत अंत्यविधी करणारे सुरेश येरावार यांचा शाल, श्रीफळ व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अद्ययावत वाफ घेण्याचे यंत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शहरातील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:33 AM