- शेख इलियास
कळमनुरी : हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोडजवळ ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर व बसच्या विचित्र अपघातात चार जण ठार तर २४ जण जखमी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना हिंगोली व नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
एम एच ३८ एफ ८४८५ ही खाजगी बस नांदेडहून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत असताना ट्रक क्रमांक आरजे ०२ जीबी-३९४५ या नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकची धडक बसली. पार्डी वळणाजवळ एका उभ्या ट्रकला चूकविण्याच्या प्रयत्नात कंटनेरची बसला समोरासमोर धडक बसली. या धडकेत खाजगी बसमधील ४ प्रवासी ठार झाले असून २४ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस कर्मचारी दादासाहेब कांबळे, शशिकांत भिसे, जगन पवार, अरविंद राठोड, शिवाजी देमगुंडे हे घटनास्थळी गेले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्यावरच असल्यामुळे क्रेन आणून दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला काढली. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. या भीषण अपघाताची माहिती मिळताची कळमनुरीतील अनेकांनी घटनास्थळ गाठले. जखमी व मयतांना रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात हलविले. कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. त्यानंतर गंभीर जखमींना हिंगोलीला हलविले. हिंगोली येथे जिल्हा रुग्णालयातही मोठी गर्दी झाली होती.
अपघातातील मृतांत यांचा समावेशया अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये पंचफुलाबाई विठ्ठल गजभार (वय ७० रा. बाभळी, ता.कळमनुरी), विठ्ठल तुकाराम कनकापुरे (वय ६०,रा ब्राह्मणगाव, ता. उमरखेड)यांच्यासह त्रीवेणाबाई राजप्पा आजरसोंडकर वय ४५, राजप्पा दगडू आजरसोंडकर (दोघे रा. आजारसोंडा ता. औंढा नागनाथ) या दाम्पत्याचाही समावेश आहे. राजप्पा यांचा उपचारासाठी नांदेडला नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर उर्वरित तिघे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले.
बसमधील तब्बल २४ जण जखमीपार्डी मोडजवळील अपघातात गजानन हरिभाऊ व्यवहारे (वय ५१, रा. कळमनुरी),सय्यद माबुद सय्यद अमीन (वय ५३, रा. हिंगोली), शेख खैरात (वय ५५, रा. हिंगोली, खाजगी बसचालक), मो रफिक मो लतीफ (वय ४५, रा हिगोली), डिगंबर बहादुरे (वय ६०, रा. पिंपरी), बाबूराव मोरे (वय ५०, रा.वारंगा फाटा), सुनंदा इंगोले (वय ४७, रा नेरली, नांदेड), एकबाल खान बशीर खान (वय २९,रा अलवार राजस्थान ट्रकचा क्लिनर ), गौतम डोंगरे (वय ५०, रा. डोंगरकडा़), कैसर बेगम काजी अलाउद्दीन वय ६० , सयद अकमल (वय ८), सफिया बेगम (वय ६०, तिघे रा. अर्धापूर), शेख आरेफा (वय ६०), शेख खाजामिया (वय ७० दोघे रा. लाख मेथा, ता. औंढा), रामप्रसाद गडदे (वय २६), सुमित्रा गडदे (वय २२, दोघे रा. तांदळवाडी), शरद शिंदे (वय ३१, रा. सेनगाव), कुंडलिक नागरे (वय ४३), शेख हबीब (वय ५०, दोघे रा. हिंगोली), सुभाष पौळ (वय ४० रा. कलगाव), विठ्ठल गजभार (वय ६०, रा. बाभळी), नंदा काळे (वय ५०, रा. हिंगोली), भाग्यश्री विठ्ठल गजभार (वय ३०, रा. बाभळी), मो. एकबाल मो. इर्शाद (वय ३६, रा. नांदेड) हे जखमी झालेले आहेत. यापैकी बाबूराव मोरे, सुभाष पौळ, विठ्ठल गजभार,नंदा काळे, भाग्यश्री गजभार, मोहम्मद इक्बाल हे सहा जण गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना हिंगोली व नांदेड येथे हलविले आहे.या जखमींना नगरसेवक म नाजिम रजवी, शिवा शिंदे, मयुर शिंदे, सागर इंगळे, योगेश ठाकूर, मुजीब पठाण, मोहम्मद रफीक, अश्विन बोरकर, शैलेश उबाळे,उमर फारूक शेख, शेख मुजम्मिल, वाजिद राज, समशेर पठाण आदींनी रुग्णालयात हलविण्यास परिश्रम घेतले. जखमीवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय डोंगरे, डॉ. आनंद मेने, डॉ. शिवाजी विसलकर, डॉ. रवी टाले, डॉ.महेश पंचलिंगे, डॉ.सोफिया खान, डॉ. संजय माहुरे, डॉ. एल. के. फेगडकर, कैलास ताटे, कैलास भालेराव व डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी उपचार केले. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि चंद्रशेखर कदम, सपोनि श्रीनिवास रोयलावार आदींनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.