लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समितीमध्ये यापूर्वी रद्द झालेली पाणीटंचाई आढावा बैठक गुरुवारी पून्हा घेण्यात आली परंतु या बैठकीत गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा न घेता फक्त आराखड्याचे वाचन करुन बैठक पाऊण तासात गुंडाळली.येथील पं.स. सभागृहात आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जि.प.सभापती संजय देशमुख, पं.स. सभापती स्वाती पोहकर, उपसभापती ममता वडकुते, तहसीलदार वैशाली पाटील, पाणी पुरवठा अभियंता के.आर.लिपने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, उपअभियंता संद्री, गटविकास अधिकारी के.व्ही.काळे, अॅड. के.के.शिंदे, विनायक देशमुख, सूर्यभान ढेगळे, विठ्ठल घोगरे, अशोक ठेंगल, गजानन पोहकर यांच्यासह जि.प. सदस्य, प.स.सदस्य सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. तालुक्यातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने भिषण पाणीटंचाई निर्माण झाली. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याच स्वरुपाच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गावनिहाय टंचाईचा आढावा बैठकीत घेणे अपेक्षित होते. परंतु यापूर्वी रद्द झालेल्या बैठकीत पाणीटंचाईवर गंभीर स्वरूपाची चर्चा न होता बैठक तासभरात गुंडाळली. बैठकीत पाच कोटींचा टंचाई आराखड्याचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये ३१ गावांसाठी ३० टँकर, १२९ गावांसाठी ३२० अधिग्रहण, १२३ गावांसाठी ३३१ नवीन विंधन विहिरी, ९ गावांमध्ये तात्पुरती पूरक नळयोजना, ३२ गावांतील नळयोजना दुरुस्ती आदींचा समावेश असलेल्या आराखड्याचे वाचन केले. याशिवाय अन्य सूचना असतील त्या ग्रामपंचायत कार्यालयाने विनाविलंब पं.स.कडे करावयाच्या असून टंचाई उपाययोजने मध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाºयांवर कारवाई करावी, निर्धारित वेळेत विंधन विहीर घेण्याचा सूचना आ. मुटकुळे यांनी दिल्या.यापूर्वी रद्द झालेल्या बैठकीत टंचाईचा सविस्तर गावनिहाय आढावा घेतला जाईल, अशी अपेक्षा सरपंचाना होती. परंतु तासभराच्या आत बैठक गुंडाळली गेल्याने सरपंचांचा भम्रनिरास झाला. किमान उपाययोजना तरी तातडीने करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तासाभरात उरकली पाणीटंचाईची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:07 AM