हिंगोली : अपघातातील जखमींना तात्काळ मदत केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. परंतु अनेकदा या जखमींना मदत करण्यास सहसा कोणी समोर येत नाही, तर काही माणुसकी जिवंत असलेली माणसे मदतीसाठी प्रयत्नही करताना दिसतात. वेळेत मदत न मिळाल्याने जखमींना रूग्णालयात घेऊन जाताना रस्त्याच मृत्यू होण्याचे अनेक उदारहणेही आहेत. असाच एक अपघात हिंगोली शहरात ६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडला.
सेनगाव येथे जि. प. शाळेत कार्यरत तरूण शिक्षक अमोल काशिनाथ दिनकर (३०) यांच्या दुचाकीला ट्रकने उडविले. यात शिक्षक दिनकर गंभीर जखमी झाल्याने रक्तबंबाळ झाले होते. अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांनी गराडा घातला होता. परंतु यातील काही माणुसकी हरविलेल्या व्यक्ती मात्र जखमीला मदत करण्याऐवजी अपघाताचे चित्रिकरणात मग्न होते. तर काहीजण जखमीचे प्राण कसे वाचतील यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. माणुसकी जिवंत असलेल्या काही सामाजिक कार्यकर्ते व आॅटोचालकांनी जखमीची ओळख पटविण्याचे काम करत त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविले. परंतु डॉक्टरांनी अमोल दिनकर यास मृत घोषित केले. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावरावरील वाहतूक शाखेतील एकही कर्मचारी मात्र घटनास्थळी मदतीला धावून आला नाही हे विशेष. अपघातातील जखमींना मदत करा, असा संदेश दिला जातो. परंतु या संदेशाचा अनेकांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दिवसेंदिवस अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही अपघात चालकांच्या चुकीमुळे तर काही अपघात रस्त्यातील खड्ड्यांमुळे होतात. अपघातातील जखमीस तत्काळ मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. परंतु जखमीला वेळेत मदत मिळत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे अपघातातील जखमींना मदत करावी याबाबत अधिक जनजागृती गरज आहे हे तितकेच महत्वाचे आहे.