हिंगोली: गत दीड वर्षापासून कोरोनामुळे शहरातील फूल व्यवसाय डबघाईस आल्यामुळे फूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. फुलांची विक्री सद्यस्थितीत ठप्प झाल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, अशी व्यथा फूल विक्रेत्यांनी मांडली.
कोरोनाआधी फूल व्यवसाय चांगला चालायचा. दिवसाकाठी ५०० ते ६०० रुपये पदरात पडायचे. परंतु दीड वर्षापासून १०० रुपयांची पण फूलविक्री होत नाही. ग्राहक मागतील त्या भावात फूलविक्री करावी लागत आहे. कोरोनाआधी फुलांना चांगली मागणी होती. विवाह, देवस्थाने बंद असल्यामुळे फूल व्यवसाय डबघाईस आला आहे. वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे परजिल्ह्यांतील फुले येईनाशी झाली आहेत. जिल्ह्यातील फुले विकत घेऊन घरसंसार चालवावा लागत आहे. सद्यस्थितीत जरबेरा २० रुपये बंडल, गुलाब ६० रुपये किलो, गलांडा २० रपये किलो, मोगरा १५० रुपये किलो भावाने विक्री होत आहेत.
शहरामध्ये फुलांची दुकाने जवळपास १० ते १२ आहेत. पिढ्यान् पिढ्या हाच व्यवसाय करीत असल्यामुळे दुसरा व्यवसाय आता करणे कठीण आहे, असे काही फूल विक्रेत्यांनी सांगितले.
हिंगोलीची बाजारपेठ फुलांसाठी चांगली असून महिन्याकाठी एक क्विंटलपर्यंत फुलांची विक्री होते. यातून जवळपास महिन्याकाठी ४० हजारांची उलाढाल होते.
फूल विक्रेत्यांना वेळ द्यावी
फूल विक्रेत्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने त्यांना जास्तीची वेळ द्यावी, म्हणजे फूल व्यवसाय करता येईल. आजमितीस फूल विक्रेत्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकही दुकानांवर येईनासे झाले आहेत. कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्नही पप्पू फुलारी, युनूस तांबोळी, शेख शौकत, शेख खलील शेख मिया यांनी उपस्थित केला आहे.
फोटो १०