हिंगोली : शासकीय पांदण मधील खडकाचे पैसे भरून देण्याच्या कारणावरून पती-पत्नीस बेदम मारहाण झाल्याची घटना सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथे २३ जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकनाथ अर्जुनराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामरतन अर्जुनराव शिंदे, कैलास रामरतन शिंदे, जितेंद्र जगताप, जयेंद्र जगताप (दोघे अनोळखी), कसबे त्यांच्या कामावरील गडी, संगीता रामरतन शिंदे, श्रद्धा जगताप, श्रृती रामरतन शिंदे, चंद्रकला माणिक वाघ, कांचन कैलास शिंदे (सर्व रा. जवळा बु.) यांच्याविरूद्ध नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, रामरतन शिंदे याने सरकारी पांदण मधील खडक नेला. त्यास विचारणा केली असता, त्याचे पैसे भरून देतो, असे लोक समक्ष सांगितले होते. परंतु, पैसे दिले नाही. याच कारणावरून आरोपींनी दारावर काठ्या मारून एकनाथ शिंदे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर काठी मारली. तसेच कैलास शिंदे याने डाव्या खुब्यावर मार दिला. एकनाथ शिंदे यांची पत्नी कौशल्या यांना जयेंद्र जगताप याने डोक्यात लोखंडी पाईप मारून डोके फोडले. तर जितेंद्र जगताप याने डावे मांडीवर पाईप मारून जखमी केले. इतर आरोपींनी ओट्याखाली कौशल्या यांना ओट्याचे खाली ओढून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच पोटात बांबूची काडी ही टोचून जखमी केले. शिवाय सर्व आरोपींनी एकनाथ शिंदे यांना खाली ओढून पोटावर, पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारून खिडकीच्या काचा फोडून मोबाईलसह ५ ते ६ हजार रूपयांचे नुकसान केले. तसेच रामरतन शिंदे याने पिस्तूल व चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. तपास सपोउपनि बी.व्ही. केंद्रे करीत आहेत.
शेत रस्त्यावरून जीवे मारण्याची धमकी
हिंगोली : शेतातून जाण्याच्या रस्त्याच्या वादाच्या कारणावरून फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथे २३ जुलै रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामरतन अर्जुनराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ अर्जुनराव शिंदे, कौशल्या एकनाथ शिंदे यांच्याविरूद्ध नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. आरोपीने रामरतन शिंदे यांना व त्यांच्या मुलास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास सपोउपनि बी.व्ही. केंद्रे करीत आहेत.