हिंगोली : ज्या शिवसैनिकांनी घरदारे बाजूला ठेवून मेहनत घेत आमदारांना निवडून दिले. ते सैनिक सोबत आहेत, ज्यांना दिले ते गेले. पण चिंता करू नका, मी तुमच्या भेटीला येणार आहे. आपण शिवसेना नव्या जोमाने उभी करू, अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील मेळाव्यात भ्रमणध्वनीवरून बोलताना घातली. तर तुमच्या घोषणांचा आवाज गद्दारांच्या कानापर्यंत गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आ.संतोष बांगर यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील विश्रामगृहात शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी उद्धवसाहेब तुम आगे बढोच्या घोषणा दिल्या. तसेच जय भवानी, जय शिवाजी.. अशा घोषणाही दिल्या. या घोषणा गद्दारांच्या कानापर्यंत गेल्या पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. तर मी लवकरच जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका लावणार आहे. मी आता पुन्हा मैदानात उभा राहिलो आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
कुणाच्याही धमक्यांना घाबरू नकासंतोष बांगर हा चांगला जिल्हाप्रमुख व आमदार होता. त्याने पक्ष सोडला यावर विश्वास बसत नाही. त्याला पक्षाने पहिले तिकीट दिले होते. उद्धव ठाकरेंचे या जिल्ह्यावर बारिक लक्ष होते. मात्र आता जे गेले त्यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा शिवसेनेचा हा बालेकिल्ला पुन्हा अभेद्य करू. तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. कुणाच्याही धमक्यांना घाबरू नका. जिल्हाप्रमुख पदासाठी अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र, आपण त्याला सांभाळले. आता दोन दिवसांत नवा जिल्हाप्रमुख नेमू. तुम्ही त्याला साथ द्या. पदावरून रुसवे-फुगवे नको. अजून कोणी गेला तर त्याही पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागा लागलीच भरा. ज्यांच्या ईडीच्या चौकशा लागल्या होत्या, त्यांच्याच शेजारी आता हे भाजपवाले बसणार आहेत. आगामी मनपा निवडणुकीनंतर शिवसेनेची ताकद कळेल आणि हे सरकार गडगडेल. मग सेनेची साथ सोडणाऱ्यांचे काय हाल होतील हे शिवसैनिक म्हणून आपल्याला माहितीच आहेत, असेही ते म्हणाले.