हिंगोली : /ज्या /पांडुरंगाने शेराचे पावशेर केला. त्याच्यावर भरवसा ठेवून आपल्या काळ्या माईच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपल्याला पांडुरंग समृद्धी आणून पावशेराचे सव्वाशेर करेल; पण यासाठी तुम्ही जिवंत असणे आवश्यक असल्याचा संदेश घेवून केमीस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटना गावागावातीलशेतकर्यांना धीर देत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ८१ गावांत स्वखर्चाने पत्रके वाटून शेतकर्यांना एकत्र करून 'जीव द्यायचा नाय..अन् देऊ द्यायचा नाय..' असा संदेश देण्यात येत आहे.
यंदा महिनाभराच्या उशिराने मान्सून दाखल झाल्याने पेरणी लांबली. पुढेही पावसात अनियमिता आणि अनिश्चितता झाली. पिके भरात असताना पाऊस कायमचा गायब झाला. हिरवी पिके जाग्यावर करपली. पावसाळ्यात उन्हाळा झाला. आजपर्यंत केलेला खर्चही निघणार नसल्याचे स्पष्ट झाले. पेरणीच सावकाराच्या कर्जावर केली होती. उसनवारी करून खत घातला. अडत्याला माल देण्याच्या कबुलीवर कीटकनाशके खरेदी करून पिकावर फवारणी केली. दुष्काळामुळे पिके काढण्याची गरज राहिली नाही. उत्पादन खर्चासाठी घेतलेले पैसे कसे फेडावे? या विवंचनेत शेतकरी सापडला. मुदत संपताच सावकार घर गाठू लागला. आधीच घरात दोनवेळच्या खाण्याचे वांधे आणि त्यात पैशांचा तगादा लागला. खाणार्यांची तोंडे अनेक, आठवडी बाजाराचा खर्च, आजी-आजोबांच्या औषधींचा खर्च, मुलींच्या लग्नाची चिंता त्यातही जनावरांना चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, असे अनेकविध प्रश्न ग्रासू लागले. खरीप निघून गेला असताना रबीच्या पेरणीपूर्वी जमीन कोरडी पडली. रबीची आशा मावळल्याने खाण्यासाठी गहू-ज्वारी विकत घेण्याची वेळ आली. चार्याअभावी जनावरे कसायाच्या दावणीला बांधण्यावाचून पर्याय उरला नाही. अनेक संकटांनी घेरला गेला. एकदाच शेकडो प्रश्न उभे राहिल्याने तो घाबरून गेला. त्या विवंचनेत मरणाला कवटाळू लागला. पाहता पाहता अनेक शेतकर्यांनी जीवनयात्रा संपविली. हे सत्र सुरूच असल्याने केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशनने जागृतीची मोहीम हाती घेतली. दुपारी ग्रामस्थ सापडत नसल्यामुळे सकाळी ७ वाजता पदाधिकारी गाव गाठतात. पाराचा कट्टा, शेकोटी, दुकानावरील गर्दी, विहिरीवर पाणी भरतेवेळीची गर्दी गाठतात. 'काळ्या माईच्या झोळीत मोत्याचे पीक पिकवू अन् सोन्याचे दिवस पुन्हा पाहू. म्हणून जीव तर कधीच द्यायचा नाही अन् देऊ द्याचाही नाही.'असे समजावून सांगतात. गेल्या आठवड्यापासून अनेक गावे पिंजून काढली.प्रामुख्याने आठवडी बाजार, गुरांचे बाजार, सार्वजनिक कार्यक्रम स्थळी गेले असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाण्याचा त्यांचा मानस आहे. /(प्रतिनिधी)
■ कुशल जैन, प्रमोद मुंदडा, सुनील पाटील खिल्लारी, संतोष बाहेती, हंसराज गणवाणी, प्रविण बगडिया, विजय मुधोळ, काबरा, दीपक धूत, राजेश बालदी, संजय टाकळगव्हाणकर, गुलाब घुगे, प्रा.कुमार भालेराव, संजय देशमुख, कैलास शैव, भारती हे पदाधिकारी आलटूनपालटून वेगवेगळ्या गावांत जागृतीसाठी जात आहेत.
■ सवड, केसापूर, घोटादेवी, पहेनी, पुसेगाव, सेनगाव, भानखेडा, हत्ता नाईक, पाटोदा, उटी ब्रह्मचारी, कापडसिंगी, साखरा, वेलतुरा, कहाकर खुर्द, कवठा, देवळा, लाख, पांगरा, काकडदाभा, फुलदाभा, पिंपळदरी, शिरडशहापूर, जवळा बाजार, खंडाळा, जयपूर, चोंढी (भाकरे), चोंढी (काळे), माझोड, मन्नास पिंपरी, कहाकर खु, म्हाळशी, आजेगाव, वाघजाळी, जवळा बु.