हिंगोली : चुकीचा अहवाल दिल्यामुळे आधीच शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिला आहे. मात्र ज्यांनी तक्रार केली अशा शेतकऱ्यांनाही विमा का दिला जात नाही. चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न दिल्यास शिवसेनास्टाईल आंदोलनाचा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिला.
६ मार्च रोजी आ.संतोष बांगर यांनी हिंगोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात भेट दिली. कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांच्याशी त्यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी आमदार बांगर म्हणाले, शेतकऱ्यांचा पीकविमा तर कृषी कार्यालयाच्या चुकीमुळे मिळाला नाही. आता तक्रार केलेल्या शेतकऱ्यांबाबतही निर्णय का घेतला जात नाही. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीकविमा कंपनीकडे तक्रार केली, त्यांनाही पीकविमा न देण्यामागची कारणे काय आहेत? असा सवाल केला.
दोन लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याची ऑनलाईन तक्रार करूनही मदत मिळत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे दुश्मन आहात का? अशा शब्दांत सुनावले.येत्या आठ दिवसांत रक्कम मिळेल, असे घोरपडे यांनी सांगितले. मात्र वारंवार आम्हाला तक्रारी कराव्या लागू नयेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तेही कृषी अधीक्षकांनी चुकीचा अहवाल दिल्याचे सांगतात. त्यावर १०० टक्के रक्कम अॅडव्हान्स देण्याचा प्रस्ताव होता, असे घोरपडे म्हणाले. मात्र त्यात काहीच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची राखरांगोळी झाली. आता तक्रार करणाऱ्यांना चार दिवसांत रक्कम मिळाली नाही तर गाठ माझ्याशी आहे, असेही बांगर म्हणाले.