शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर हातात रुमणे घेऊ; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:10 PM2019-11-06T15:10:04+5:302019-11-06T15:15:05+5:30
हिंगोलीत मुख्य मार्गावर अर्धातास वाहतूक ठप्प
हिंगोली : राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रसतर्फे ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथील अकोला-बायपास येथे रास्तारोको करण्यात आले.
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. मुख्य मार्गावर रस्तारोकोमुळे जवळपास अर्धातास वाहतुक ठप्प होती. वाहनांच्या रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अग्निशामक दल व रूग्णवाहिका आंदोलनस्थळी उभ्या दिसून आल्या. हिंगोली ग्रामीणचे पोनि अंगद सुडके तसेच अधिकारी कर्मचारी हजर होते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर उभे नाही...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. परंतु परतीच्या पावसाने बळीराजा हतबल झाला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच आंदोलन करण्यात आले आहे. यापुढेही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास हातात रूमणे घेऊन काँग्रेस आंदोलन उतरेल असा इशारा आ. भाऊराव पाटील यांनी दिला.
आंदोलनात माजी आ. भाऊराव पाटील गोरेगांवकर, शामराव जगताप, मिलींद उबाळे, गणेश थोरात, रामेश्वर लिंबाळे, बी. टी. कावरखे, रूपाजी कºहाळे, एकनाथ शिंदे, बाजीराव जवळेकर, बालाजी गावंडे, शिवप्रसाद जगताप, रंगनाथ घोंगडे, निरज देशमुख, सुमित चौधरी, जहिरभाई इटवाले, विशाल इंगोले, पवन उपाध्याय यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.