१६ जानेवारी, २०२१ पासून जल्ह्यातील ३३ केंद्रांवर लसीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठांसह युवकही आता लसीकरण करून घेण्यात पुढेच दिसत आहेत. केंद्रावरील कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरीत्या माहिती दिली नाही गेली, तर रजिस्ट्रेशन बरोबर होत नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
शहरापेक्षा ग्रामीण भागात रजिस्ट्रेशन बरोबर न होण्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्रावरील कर्मचारी घाईगडबडीने लसीकरणासाठी आलेल्या युवक व ज्येष्ठांची नावनोंदणी करीत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पहिल्याच डोसचे प्रमाणपत्र मिळाले नाही, दुसरा कसा घेऊ, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोबाइल नंबर कोणाचा हेच आठवत नाही
कोरोना महामारीच्या भीतीमुळे लसीकरण करून घेतले, परंतु मोबाइल नंबर कोणाचा टाकला, हेच कळायला मार्ग नाही. यानंतर प्रमाणपत्रासाठी केंद्रावर गेलो. तेथील अधिकाऱ्यांनी मोबाइल नंबर विचारला, पण मला आठवत नव्हता. आता मी दुसरा डोस कसा घेऊ, असा सवाल एका युवकाने केला.
लसीकरणावेळी ही घ्या काळजी
n लसीकरण करतेवेळेस केंद्रावर आपल्या आपले नाव, मोबाइल नंबर, आधारनंबर व्यवस्थित देणे गरजेचे आहे.
n केंद्रावर लसीकरण केल्यानंतर लगेच कर्मचाऱ्याशी प्रमाणपत्राबाबत बोलून घ्यावे. ज्यांनी लसीकरण केले आहे, त्यांनी नाव परत एकदा संगणकावर पाहून घेणे गरजेचे आहे.
रजिस्ट्रेशन करतेवेळेस माहिती व्यवस्थित द्या...
जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले रजिस्ट्रेशन व्यवस्थित होत आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. कर्मचाऱ्यांनी विचारलेली माहिती व्यवस्थितरीत्या द्यावी.
- डाॅ.प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली.
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास...
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावे. लस घेतल्याचा पुरावा असेल, तर आरोग्य विभागाशी संपर्क करून दाखवावा. यानंतर आरोग्य विभाग तुमचे म्हणणे, तसेच समस्यांची यादी एकत्र करून सरकारला कळवेल.