हिंगोली - राज्यातील सत्तांतराच्या घटनेवेळी शिंदे गटाचे काही आमदार चांगलेच चर्चेत आले. त्यामध्ये, सांगलीचे आमदार शहाजीबापू पाटील आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे लोकांच्या अधिक लक्षात राहिले. कारण, संतोष बांगर हे अगोदर रडले होते, शिंदे गटाच्या आमदारांना त्यांनी एकप्रकारे शाप दिला होता. मात्र, अखेर तेच शिंदेगटात सहभागी झाले. त्यामुळे, संतोष बांगर चांगलेच चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कँटीन व्यवस्थापकाला कानाखालीही लगावली होती. त्यावरुन ते चर्चेत असतानाच, युवासेनेच्या एका कार्यकर्त्याने त्यांना चॅलेंजच केलं आहे.
हिंगोलीतील युवासेनेचे कार्यकर्ता असलेल्या दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना निवडणुकीचं आव्हान दिलं आहे. 'माझं आव्हान आहे की, संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं. पण, त्यांच्यात हिंमत नाही. भविष्यात जेव्हा केव्हा पुढची निवडणूक लागेल, तेव्हा त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. जर ते निवडून आले, तर माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी मी दान करायला तयार आहे, असं चॅलेंजच घुगे यांनी दिलं आहे. दरम्यान, तसं झाल्यास मी भिक्षा मागून खाईन, असेही कार्यकर्ता घुगे यांनी म्हटलं. हिंगोलीत
हिंगोलीत शिंदे गटाचा ना आमदार निवडून येईल, ना खासदार असा दावाही त्यांनी केला आहे. येथील खासदार देखील पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, जर बंडखोर गटातील खासदार पुन्हा निवडून आले, तर माझ्या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांकडून मी एकेक रुपया जमा करेन आणि १ लाख लिटर दुधाचा अभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करेन, असं चॅलेंज घुगे यांनी बांगर यांना केलं आहे. तसेच, सध्या तुमची सत्ता आहे, ती जास्त डोक्यात जाऊ देऊ नका. लोकांची विकासकामं करा. गरीबांना मदत करा, असा उपरोधात्मक सल्लाही दिला.
तर मी कायदा हातात घेणार
मध्यान्ह भोजन योजनेतील तक्रारीवरुन व्यवस्थापकाला मारहाण केल्यानंतरही संतोष बांगर आपल्या भूमिकेवर ठाम होते. "माझ्यावर गुन्हा दाखल होण्याची मला भीती नाही. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक गुन्हे दाखल झाले तरी मला पर्वा नाही" असं बांगर यांनी म्हटलं आहे. "खराब झालेल्या दाळी, खराब झालेले हरभरे, खराब झालेले कांदे माध्यमांना दाखवलं. मला सहन झालं नाही. माझ्या गरिबांवर अन्याय होत असेल तर मी कायदा हातात घेतल्याशिवाय राहाणार नाही. ज्या गरिबांनी मला निवडून दिलं त्यांना न्याय देण्याचं काम मी करत राहीन."