लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रिसाला बाजार परिसरात जिल्हा रुग्णालयासमोर भूमिगत गटार योजनेच्या कामाची खोली तब्बल ८ मीटर आहे. त्यातच खाली काळा दगड लागल्याने कामाला गती नव्हती. तर सुरक्षेचे उपाय नसल्याने धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केल्याने अर्धे खोदकाम बुजवलेही होते. मात्र उर्वरित खोदकामानेच घात केला.भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी सुरक्षिततेचे उपाय करणे मोठे गरजेचे असते. कोणत्याही मोठ्या शहरात या योजनेचे काम करणे अवघडच असते. त्यातच जुन्या भागात अरुंद रस्ते, कामाची खोली इ. बाबी धोकादायकच ठरतात, हा अनुभव सगळीकडेच येतो. हिंगोलीतही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी रात्रंदिवस काम चालत आहे. मात्र काही भागात सुरक्षेचे उपाय केले असले तरीही काही भाग मात्र त्यापासून दूरच आहे. परिणामी अशा ठिकाणी आतापर्यंत किरकोळ अपघातांवर निभावले. मात्र शेख इब्राहिम हा १४ वर्षाचा बालक जिल्हा रुग्णालयासमोर खड्ड्यात उतरल्याने बळी ठरला आहे. त्यातच या खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने तो बुडून मृत्यू पावल्याचे दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी रिसाला बाजार भागातील नागरिकांनी हे काम अनेक दिवसांपासून चालू असल्याची नाराजी व्यक्त केली होती. परंतु खाली काळा दगड असल्याने कामाला गती देणे शक्य नसल्याने प्रशासन व कंत्राटदारही हतबलता व्यक्त करीत होते. शिवाय इतर उपाय वापरल्यास इमारतींना धोका होण्याचा संभव होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही हे खोदकाम तसेच राहिल्याने नागरिक बोंब ठोकत होते. विशेषत: शाळा सुरू होणार असल्याने लहान मुलांना एकट्याने ये-जा करण्यासाठी हा रस्ता धोकादायक बनल्याची बोंब होती. याच भागात जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण येतात. अनेकदा त्यांच्यासोबत नातेवाईक, लहान मुलांचाही समावेश असतो. अनेकांकडे या भागातील नागरिकांनी ही कैफियत मांडली होती. लोकमतने त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर १ जून रोजी लागलीच हे खोदकाम बुजवण्यास प्रारंभ झाला होता.मात्र एका चेंबरचे काम करण्यासाठी अर्धवट बुजवून ते पुन्हा पूर्ण केले नाही. दुर्दैवाने यातच मंगळवारी ही घटना घडली.दरम्यान, या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय नसल्यानेच बालकाचा बळी गेल्याची प्रतिक्रिया राकाँ शहराध्यक्ष जावेद राज यांनी दिली.
... तर अनर्थ टळला असता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:42 AM