राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली आहे. या संदर्भात एस. टी. चालक मनोहर बाबूराव वाकळे यांना विचारले असता ते म्हणाले, घर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आहे. घरात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असे पाच सदस्य आहेत. स्वेच्छा निवृत्ती मी घेतलीही असती. परंतु, मला दुसरे कोणतेही उदनिर्वाहासाठी साधन नाही. सर्व काही मी राज्य परिवहन महामंडळाच्या पगारावरच भागवतो.
१ एप्रिल १९९१ मध्ये मी राज्य परिवहन महामंडळात चालक या पदावर रुजू झालो. २९ वर्षे आज मला सेवेत झाले आहेत. सध्या मला ५७ वर्षे पूर्ण झाले आहेत. मी यापूर्वी परतूर आणि आता हिंगोली येथे कार्यरत आहे. १९९१ मध्ये मी दीड हजार रुपयांच्या पगारावर महामंडळात रुजू झालो.
आजमितीस महागाईने कळस गाठला आहे. मी घरामध्ये कर्ता असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. स्वेच्छा निवृत्ती घेतली तर घराची जबाबदारी पूर्ण कशी करु, सांसाराला हातभार कसा लावू? असा सवाल वाकळे यांनी उपस्थित केला.
स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?
स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यानंतर राहिलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षाकरीता ९० दिवसांचे वेतन, मूळ वेतन (महागाई भत्यासह) व अपूर्ण वर्षाकरीता त्या प्रमाणात मोबदला दिला जाईल. सेवानिवृत्तीप्रमाणे देय असलेले लाभ म्हणजे भवि्ष्य निर्वाह निधी, उपदान, रजा रोखीकरण आदी लाभ रा. प. नियमानुसार देय राहील. अपराध प्रकरण अथवा गंभीर प्रकरण प्रलंबित असल्यास १५ दिवसांत संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून पूर्ण करण्यात येईल.
कर्मचाऱ्याचा कोट
महागाईने कळस गाठला आहे. साधा पेन घ्यायचा म्हटले तर १० रुपये मोजावे लागत आहेत. मी जर आजमितीस स्वेच्छा निवृत्ती घेतली तर संसाराचा गाडा विस्कटल्याशिवाय राहणार नाही.
- मनोहर बाबूराव वाकळे
चालक, एस. टी. महामंडळ, हिंगोली
कर्मचारी पत्नीचा कोट
आमच्या घरात कोणीही कर्तापुरुष नाही. मुलांचे, नातवांचे शिक्षण चालू आहे. किराणा माल, भाजीपाला खरेदीसाठी पदोपदी पैशाची गरज पडते. स्वेच्छा निवृत्तीचे पैसे काही दिवस पुरतील, पण नंतर काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला.
- रेखाताई मनोहर वाकळे, हिंगोली