हिंगोली :कोरोना काळात मंदिरे बंद केली. नंतर परवानगी दिली तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माणसांनी मंदिरात जायचे नाही, असा आदेश काढला. मग काय तरुण तेथे जाणार? भजन करायचे नाही, कीर्तन करायचे नाही. मग काय करायच? संजय राऊत ( sanjay raut ) यांचे अग्रलेख वाचायचे काय? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांनी केला.
ते म्हणाले, एवढी अतिवृष्टी झाली. मात्र कोणीच आले नाही. सगळे काही चाललयं ते मातोश्रीवरून चालले. मात्र जर कोणी नाही आली तर बोंब मारायची का? त्यावरून निवेदने, तक्रारी द्या. ग्रामपंचायतीपासून ते तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विषयांचे गांभिर्य ठेवून जेथे सरकारचे चुकले त्याबद्दल बोलले पाहिजे. निवेदने दिली पाहिजे. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे निवेदन दिले पाहिजे. कोणतीच निवडणूक बिनविरोध जावू द्यायची नाही. प्रत्येक निवडणुकीत भाजपने सक्रिय सहभाग घ्यायचा. तुम्ही लढायला सिद्ध व्हा, यश नक्की मिळेल. आगामी निवडणुका ताकदीने लढवल्या गेल्या पाहिजे. जनतेच्या प्रश्नांवर तुम्ही रान उठविले पाहिजे. भाजपमध्ये पक्षादेश जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला कधी लोकप्रतिनिधी म्हणून चांगली संधी मिळू शकली तरीही कधी कधी तुम्हाला पक्ष संघटनेचे काम करायचा आदेश मिळाला तर ते करावे लागते. रावसाहेब दानवे यांना केंद्रिय मंत्री असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पाठविले. त्यांनी ते काम केले. आता पुन्हा ते मंत्री झाले आहेत.
यावेळी रामराव वडकुते यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे सांगून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांचा येथे येवून सत्कार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर रामराव वडकुते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा त्यांनीच दिल्या.