रुग्णवाहिका वेळेवर हजर होत नाहीत, ही गंभीर समस्या आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या संबंधित यंत्रणेला त्यांनी इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही ही समस्या सुटत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक खासगी रुग्णवाहिकाही जिल्हा रुग्णालय व जि.प.च्या आरोग्य विभागाने भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. मात्र, त्या वेळेत उपयोगात येत नाहीत. १०८ रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी केल्यानंतर दोन तास प्रतीक्षा करूनही ती आली नाही. ही रुग्णवाहिका कोरोनाबाधित जि.प.अध्यक्ष गणाजी बेले यांना हिंगोलीहून औरंगाबादला हलविण्यासाठी मागविली होती. जि.प.अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असून त्यांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नसेल तर मग ती काय कामाची? २० मिनिटांत गाडी पाठव नाही तर पेट्राेल टाकून फुकून देईल, असा दम आ.संतोष बांगर यांनी भरल्यानंतर रात्री उशिरा रुग्णवाहिका हजर झाली. बुधवारी रात्री बेले यांना औरंगाबाद येथे एका रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णवाहिका फुकून देईन, असा दम भरण्याची ही क्लिप मात्र चांगलीच व्हायरल झाली आहे.