लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : मोफत वीज जोडणी देण्याची योजना असलल्या सौभाग्य योजनेत गुत्तेदार करत असलेल्या हातचलाखीकडे वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सौभाग्याच्या मीटरसोबत एमसीबी स्विच बसवणे गरजेचे असताना किटकॅट बसवून बोळवण केली जात आहे. गुत्तेदाराने केलेल्या कामाची चौकशी करणारी यंत्रणाच झोपेत असल्याने लाभार्थ्यांची कोंडी होत आहे.सौभाग्य योजनेंतर्गत नवीन विद्युत मीटर मोफत बसवून देण्याची योजना आहे. महावितरणने या कामाच्या निविदा काढल्या, विद्युत ठेकेदारांनी निविदा घेतल्या व वीज मीटर बसवण्याचे काम कमी दराने अनेक खाजगी इसमांना विकले. त्यामुळे पोटगुत्तेदार पद्धती सुरू झाली. पोटगुत्तेदाराला काम परवडत नसल्याने वीज मीटर बसवताना पैशाची मागणी करून लाभार्थ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार झाले. अनेक गावांत तर गुत्तेदाराने लावलेली माणसेच मीटरसाठी पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. आता पोटगुत्तेदारीचा प्रकार सौभाग्यमध्ये सुरू झाला. मग मीटरसोबत साहित्याची विल्हेवाट लागणे सुरू झाले.हट्टा विभागाअंतर्गत झालेल्या सौभाग्य कामात तर एमसीबी स्विचच पळवले असल्याचे पाहवयास मिळत आहे. एमसीबी स्विचऐवजी चिनीमातीचे किटकॅट व वायरही निकृष्ट दर्जाचे आहे. सोबतची जीआय तार ही गुत्तेदाराने खावून टाकल्याचे जागोजागी पहावयास मिळत आहे. वीज वितरण अधिकाºयांचे सौभाग्य योजनेच्या कामाच्या दर्जावर लक्ष नाही. गुत्तेदारांना खुश ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. चौकशी व नियंत्रण ठेवणारे अधिकारीच गुत्तेदारासोबत असल्याने चौकशी कोणी करावी, असा प्रश्न निर्माण झाला ओह. अशा अवस्थेत सौभाग्याचे काम वसमत तालुक्यात सुरू आहे.वसमत तालुक्यात होत असलेल्या सौभाग्यच्या कामाची नवीन वीज जोडण्या दिलेल्या लाभार्थ्यांचासोबत वितरणच्या अधिकाºयांनी चर्चा केली तर सौभाग्य योजनेच्या गुत्तेदारांची हातचलाखी समोर येवू शकते. सौभाग्य योजनेत ज्या तरतुदी आहेत त्या प्रमाणे साहित्य लाभार्थ्यांना मिळाले तरी सौभाग्य समजले जात आहे. सरसकट मीटरची फेरतपासणी करून वास्तव परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज आहे. नेमके तेच होत नसल्याने गुत्तेदार मात्र मजेत असल्याचे चित्र आहे. असे झाले तर पोटगुत्तेदारीलाही आळा बसू शकतो.
गुत्तेदारांच्या हातचलाखीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:52 PM