लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील ग्रामीण भागात बनावट दारूबरोबरच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. दारू दुकानावरून सर्रास वाहनात बॉक्स ठेवून दारू अवैधरीत्या घरपोच विक्री केली जात असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थागुशा व कुरूंदा पोलीस अशा प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्यामुळे अवैध व्यवसाय फोफावत आहेत.ग्रामीण भागातील सेंदुरसना, वाघी-शिंगी, मार्डी, वाई, गोरखनाथ, चोंढी शहापूर, लक्ष्मण नाईकतांडा, हिरडगाव, चोंडी आंबा,पांगरा शिंदे, वाखारी, कुपटी आदी गावात किराणा दुकानापासून पानटपऱ्या, औंढा, वसमत या राज्य रस्त्यावरील लहान मोठ्या धाब्यावर देशी- विदेशी दारू सर्रास मिळू लागली आहे. दारू विक्रेते मात्र सव्र नियम डावलून हा व्यवसाय तेजीत करीत आहेत. स्थानिक पोलीस व गुन्हा अन्वेशन विभागाचे कर्मचारी थातूर-मातूर कार्यवाही करून तडजोडीअंती सोडून दिले जाते.औंढा -वसमत रस्त्यावरील सर्व धाब्यावर व परिसरातील बहुतांश गावात बनावट दारूसह देशी दारूची बंदमध्येसुद्धा पोलीसांसमक्ष खुलेआम विक्री केली जाते. यामुळे अवैध व्यवसाय करणारे वरचढ झाले आहे. काहीजण पोलिसांच्या अंगावर धाऊन जात आहे. असे प्रकार नेहमी घडत असताना सुद्धा या परिसरातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी अधिकारी कोणतेच पाऊल उचलत नसल्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. महिलांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. दिवसभर काम करून रात्री धिंगाणा होत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. या सर्व बाबींना राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस अधिकारी हेच पाठबळ देतात की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.
अवैध दारूविक्रीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:28 PM