हरभरा कापणीच्या कामाला वेग
फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव, एकांबा, वडद व परिरसरातील शेतशिवारात हरभरा कापणीला सुरुवात झाली आहे. या शेतीकामाने आता वेग धरला असून काही ठिकाणी वाढ तर काही ठिकाणाच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी बऱ्याच ठिकाणच्या पिकात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
मजुरांचे स्थलांतर वाढले
कळमनुरी : कोरोना महामारीमुळे अनेक जणांची हातावरची कामे सुटली. त्याचबरोबर गावातही रोहयो अंतर्गत कामे होत नसल्यामुळे बरेच मजूर कामाच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. पण जेमतेम मिळणाऱ्या पैशामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे अनेक मजूर औरंगाबाद, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, गुजरात, सुरत व इतर मोठ्या शहरामंध्ये कामाच्या शोधात जात आहेत.
पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील विहीर, बोअर व ओढे आटत आल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. अनेक भागातील महिला व पुरुष पाण्यासाठी सकाळपासून बाहेर निघत आहे. तर बरेच जण शेतशिवारातून पाणी आणतांना दिसून येत आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच गावात टँकरद्वारे विकत पाणीदेखील गावकरी आणत आहेत.
बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
वसमत : तालुक्यात मागील चार दिवसांपासून सकाळी व रात्री थंडगार तर दुपारच्या सुमारास कडक ऊन पडत असल्यामुळे गरम वातावरण राहत आहे. या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वयोवृद्धांना दमा, छातीत दुखणे, अंगदुखी, डोके दुखणे तर बालकांना ताप, हिवताप, सर्दी, खोकला आदी रोगांची लागण होत आहे. यामुळे पालकांत व नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष
हिंगोली : शहरातील अकोला बायपास, वाशिम रस्ता, खटकाळी बायपास परिसरातील रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे नेहमी या ठिकाणी छोटे - मोठे अपघात होत आहेत. वारंवार या रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून होत असताना याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केलेले आहे.
हळद पिकावर करपा
औंढा नागनाथ : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे. मागील दहा दिवसांपासून या पिकाची पाने पिवळी पडून करपत आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नेहमी पिकांची लागवड करून या ना त्या कारणाने पिकाचे होणाऱ्या नुकसानाला शेतकरी कंटाळला असून हळद पिकाबाबत मार्गदर्शन व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
स्वच्छतागृहात स्वच्छता करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील पोलीस कवायत मैदान, गांधी चौक, इंदिरा चौक ठिकाणी नगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहात मोठी अस्वच्छता झाली आहे. या अस्वच्छतेमुळे नागरिक लघुशंकेसाठी स्वच्छतागृहाचा वापर करीत नसून बाहेरच लघुशंका करीत आहेत. यामुळे रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या महिलांची कुंचबणा होत आहे. त्यासाठी या स्वच्छतागृहात स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.