हिंगोली : जिल्हाभरात अवैध दारूची विक्री, मटका जुगार जोरात सुरू असून, अवैध धंद्यांनी कळस गाठला आहे. सामान्य नागरिकांतून ओरड होत असताना, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत होता. मात्र, पोलिसांनीच ९ जुलै रोजी जिल्हाभरात कारवाईची धडक मोहीम राबवित गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांनी कळस गाठल्याचे स्पष्ट झाले. अनेक दिवसांनंतर कडक कारवाई राबविल्याने अवैध धंदे चालकांची मात्र चांगलीच भंबेरी उडाल्याचे पाहावयास येत होते.
पोलिसांनी हिंगोली शहरातील इंदिरा नाट्यगृह परिसरात सुनील सोपानराव खंदारे (रा.अकोला बायपास) हा मटका जुगार खेळवित असताना आढळून आला. त्याच्याकडून रोख ८०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे रमेश मोतीराम वैद्य याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व रोख १ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर परिसरात शंकर तुकाराम पवार याच्याकडून ९ हजार ६०० रुपयांची दारू व एक दुचाकी जप्त करण्यात आली, तसेच हिंगोली शहरातील एसआरपीएफ कॅम्पसमोर शेख नूर शेख बाबू (रा. मालवाडी) हा मटका जुगार खेळवित असताना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी रोख १ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. त्यानंतर, हिंगोली शहरातील अकोला बायपास भागात गणेश अजबराव रौराळे (रा. पेन्शनपुरा) हा मटका जुगार खेळवित असताना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी ८१० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
सेनगाव तालुक्यातील जांभरुण रोडगे पाटीवर नर्सी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी कल्याण व मिलन नावाच्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी लक्ष्मण महिमाजी रोडगे याच्याविरुद्ध कारवाई करीत त्याच्याकडून १,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर, जवळा बु. येथे कारवाई करीत नगीनाबाई प्रकाश काळे (रा.नर्सी ना.) या महिलेकडून ७०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. जवळा बु. येथेच लक्ष्मण माणिक पवार (रा.खरबी) याच्याकडून पोलिसांनी १ हजार ५० रुपयांच्या देशी दारू बॉटल जप्त केल्या. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कळमनुरी तालुक्यात मटका, जुगार जोमात -
कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर पोलिसांनीही वारंगा फाटा येथील बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी गजानन पंडितराव कदम (रा. वारंगा फाटा) याच्याकडून मटका जुगाराच्या साहित्यासह १ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर, तालुक्यातील येहळेगाव येथे संदीप गोविंदराव पवार याच्याकडून १ हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. बोल्डा फाटा येथे एका मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून, विठ्ठल भिकाजी रणवीर (रा.पोत्रा) याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करत कारवाई करण्यात आली.
औंढा तालुक्यातील पुरजळ येथे मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोहन मारोती दुधे (रा. पूरजळ), सखाराम काळे (रा. येळी केळी) याच्याकडून १२ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सेनगाव तालुक्यातही कारवाई
गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील हाताळा येथे ३३ हजार ५० रुपयांच्या दारूच्या बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी सय्यद अनिस सय्यद मुस्सा (रा.अनसिंग हमु. हाताळा) याच्याविरुद्ध गन्हा नोंद झाला. गोरेगाव येथे झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना, प्रकाश अमृता पावडे, कलीम खॉ बस्मीला पठाण, सिकंदर शे. अहमद, गजानन नारायण राऊत, संदीप नामदेव कावरखे हे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराच्या साहित्य जप्त केले. दरम्यान, जुगाऱ्यांविरुद्ध, तसेच दारू विक्रेत्यांविरुद्ध त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस तपास करीत आहेत.
वसमत तालुक्यातही कारवाईचा धडाका
वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून आशिंद पिराजी दातार, गोपीनाथ विश्वनाथ जाधव, सचिन भूजंग दातार, गंगाधर तुकाराम दातार, कैलास दशरथ जाधव, तुकाराम हनमंतराव वाघमारे यांच्यावर गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून ७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वसमत शहरातील कारखाना रोडजवळील पाण्याच्या टाकीजवळ मटका खेळविणाऱ्या शेख सादूल शेख खयूम याच्याकडून १ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच वसमत शहरातील गणेशपेठ भागातून पंकज बालाजी शंकेवार याच्याकडून ५ हजार ७६० रुपयांच्या दारूच्या बॉटलसह दुचाकी जप्त केली. तालुक्यातील आसेगाव येथेही कौसाबाई अनिल पवार या महिलेकडून ६ हजार ८८० रुपयांच्या देशी दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या. हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील टेभूर्णी रोडवर विलास तुकाराम संवडकर (रा. हाकसापूर) याच्याकडून २ हजार २२० रूपयांच्या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. वसमत तालुक्यातील जवळा बाजार येथे अनिल रंगनाथ भारशंकर याच्याकडून २ हजार ६४० रुपयांच्या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. गुंडा येथील तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ज्ञानदेव संभाजी चव्हाण, दत्ता भीमराव भालेराव, गजानन बळीराम भालेराव, ज्ञानदेव मारोतराव भालेराव, आश्रोबा मैनाजी चव्हाण, दत्तराव बापूराव दशरथे, ज्ञानदेव खंडूजी मलांडे, उत्तम मारोतराव भालेराव, प्रताप साहेबराव भालेराव यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख १० हजार ९९० रुपये, जुगाराचे साहित्य व दुचाकी असा १ लाख ६९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.