हिंगोली : पुण्याहून निघालेले खा. राजीव सातव यांचे पार्थिव हिंगोलीत रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास दाखल झाल्यानंतर अमर रहे... अमर रहे... राजीव सातव अमर रहे ! अशा घोषणा देत त्यांच्या चाहत्यांनी रुग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी केली.
सातव यांचे पार्थिव पुण्याहून निघाल्यापासून कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हिंगोलीत तयारी करीत होते. सायंकाळी साडेसहा वाजेपासून शहरातील अग्रसेन चौकात कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते जमले होते. अनेक गोरगरीब पुरुष व महिलाही फुले घेऊन हजर असल्याचे दिसत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सामाजिक अंतर पाळत जमलेले हे हजारो कार्यकर्ते अमर रहे... अमर रहे.. राजीव सातव अमर रहे...! च्या घोषणा देत होते. जीव डोळ्यात आणून आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी ही मंडळी थांबली होती. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. वारंवार गर्दीला हटविण्याचा प्रयत्न केला तरीही चाहते काही हटायला तयार नव्हते. अखेर ७.४५ वाजेच्या सुमारास राजीव सातव यांचे पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका हिंगोलीत दाखल झाली. या ठिकाणी ती पोहोचल्यानंतर रुग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी करून चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेकांना गहिवरून आले होते. डोळ्यात अश्रू आणि नेत्याच्या चेहऱ्याची झलक पहायला मिळते का, या विवंचनेतच रुग्णवाहिका हळूहळू पुढे सरकली. अनेकांनी दुरूनच रुग्णवाहिकेचे दर्शन घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यानंतर ही रुग्णवाहिका कळमनुरीकडे रवाना झाली. मात्र रुग्णवाहिकेकडे पाहातच हा जमाव बराच काळ रस्त्यावरून हलत नसल्याचे दिसून येत होते. अनेक जण जागीच घुटमळत असा मोठा नेता गेल्याचे दु:ख व्यक्त करताना दिसत होते. एक-दोन महिलांना तर अश्रू अनावर झाल्याचेही दिसून येत होते.
वाहतुकीच्या नियंत्रणासाठी दमछाक
अग्रसेन चौकात खा. राजीव सातव यांच्या चाहत्यांची जमलेली मोठी गर्दी नियंत्रणात आणताना पोलिसांची मोठी दमछाक होत असल्याचे दिसत होते. जरा रस्ते मोकळे केले की, पार्थिव घेऊन येणारी रुग्णवाहिका आल्याचे समजून पुन्हा रस्ता गर्दीने भरून जात होता. रुग्णवाहिका आल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काहींनी सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्यानंतर रुग्णवाहिकेचा मार्ग तेवढा मोकळा करण्यात आला. त्यामुळे अनेकांना निदान पुष्पांजली तरी अर्पण करता आली.