कळमनुरी : उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन अंतर्गत १०० पदे मंजूर आहेत. त्यातील ७० पदे रिक्त असल्यामुळे केवळ ३० कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार येत असल्याने पाटपाणी वितरणावर परिणाम होत आहे.
कळमनुरी तालुक्यात इसापूर उजवा कालवा ५२ किलोमीटरचा असून, या कालव्यावर कोळी वितरिका ३० किलोमीटर व भाटेगाव शाखा कालवा वितरिका ३० किलोमीटर आहे. तसेच यावर छोट्या - मोठ्या लघुवितरिका आहेत. या उपविभागांतर्गत असे विस्तीर्ण स्वरूपात अंदाजित २५० किलोमीटरचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. सन २०२० -२१मध्ये पहिल्या रब्बी हंगामासाठी ईसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. गेल्या आठ वर्षांत कर्मचारी भरतीही झालेली नाही. त्यामुळे पाणी चोरीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. तसेच शेवटच्या घटकापर्यंत लाभ क्षेत्रात पाणी पोहोचणे अवघड झाले आहे. उर्ध्व पैंनगंगा प्रकल्प विभाग एक अंतर्गत रिक्त पदांमुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहेत. यामुळे कामाचे याेग्य नियाेजन होईल तसेच हाेणारी गैरसाेयही थांबवता येईल. यामुळे या उपविभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व्ही. एस. जिरवणकर यांनी केली आहे.