हिंगोली : विविध मागण्यांसाठी पालकांनी चक्क शाळेसमोरच उपोषण सुरू केले आहे. हिंगोली येथील पोदार शाळेत शैक्षणिक दर्जा सुधारण्यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे.
१९ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून पोदार इंटरनॅशनल स्कूलसमोर पालकांनी हे उपोषण सुरू केले आहे. पालकांनी शाळेवर काही आरोप केले असून काही मागण्याही ठेवल्या आहेत. यामध्ये मुलांना योग्य शैक्षणिक सुविधा व्यवस्थित दिल्या जात नाहीत. शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वर्गातील विद्यार्थी संख्या सी.बी.एस.सी. नियमानुसार करावी, शैक्षणिक साहित्यांची चढ्या दराने विक्रीतून होणारी पालकांची पिळवणूक रोखावी, शाळेने मागील वर्षी ५० टक्के अभ्यासक्रम कमी केला तो पूर्ववत करावा, सी. बी.एस. सी. नियमाप्रमाणे पात्र शिक्षकांची नियुक्ती करावी, शाळेतील हेकेखोर व्यवस्थापन सदस्यांची बदली करावी, राज्य शासनाने व केंद्र शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व समन्वयक मनमानी करीत असून त्यांच्यावर कारवाई करावी, शैक्षणिक साहित्य, गणवेश विशिष्ट ठिकाणी खरेदी करण्यासाठी सक्ती करु नये, सी.बी.एस.सी.च्या शालेय पाठ्यक्रम हा केवळ एन.सी.आर.टी.च्या पुस्तकेच मूळ प्रतिमध्ये शाळेत वापरण्यात यावे, त्याची जास्त किंमत लावू नये, पोदार शाळेमध्ये पी.टी.ए. ची मिटिंग प्रत्येक महिन्याला घ्यावी, तर बनावट पीटीएवर कारवाई करावी, मागील वर्षीच्या उत्तरपत्रिका पालकांना झेरॉक्स स्वरूपात द्याव्या आदी मागण्या केल्या. उपोषणस्थळी आमदार तानाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी भेट दिली.