औंढा नागनाथ (जि. हिंगोली): पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री हरपाल कौर यांनी आज ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन घेतले.
हरपाल कौर यांचे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी दत्त संस्थान मठामध्ये असलेल्या संत जनाबाईंच्या जात्यांची पाहणी केली. या जात्याचे महत्व संत नामदेव यांनी गुरुग्रंथामध्ये केले आहे. यामुळे शिख समुदायात यास महत्वाचे स्थान आहे. पंजाब येथील भाविक औंढा येथे या जात्याच्या दर्शनासाठी नियमित येतात.
दरम्यान, नरसी येथील संत नामदेव महाराज मंदिरात हरपाल कौर यांनी मागच्या महिन्यात भेट दिली होती. यापुढे प्रत्येक महिन्यात येथे दर्शनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्या नरसी नामदेवकडे रवाना झाल्या.
सुरुवातीला हरपाल कौर यांचा संस्थांकडून सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी दत्तमठ येथेही मठाचे महंत शाम गिरी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार, दत्ता ठोंबरे, स्थानिक जमादार संदीप टाक, रवी इंगोले, ज्ञानेश्वर गोरे आदींची उपस्थिती होती.