हिंगोली : येथील कळमनुरी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे २ नोव्हेंबरपासून मुख्य रस्ता बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या मार्गावरील मोठी वाहने अकोला बायपास, गारमाळ ते खटकाळी बायपास मार्गे वळविली आहे. तर लहान व दुचाकी वाहनांसाठी नवी रेल्वे उड्डाणपुल, जिनमाता नगर, रेल्वे भूयारी पूल, खटकाळी बायपास हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
हिंगोली ते कळमनुरी रोडवरील रेल्वे गेट नं. १४४ बी येथे उड्डाणपुलाचे काम एमआरआयडीसी मार्फत हाती घेण्यात आले आहे. सध्या याच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. मात्र रेल्वेच्या कामामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत असून सोमवारी एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाणीची घटनाही घडली. होणारी वाहतूक कोंडी व पुलाच्या कामामुळे हा मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आहे. त्यानुसार २ नोव्हेंबरपासून मुख्य मार्ग बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
मोठ्या वाहनांसाठी असा असणार पर्यायी मार्गहिंगोली शहरांतून कळमनुरीकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांसाठी अकोला बायपास-गारमाळमार्गे खटकाळी बायपास असा पर्यायी मार्ग असणार आहे. तसेच कळमनुरीकडून हिंगोली शहरात येण्यासाठी याच मार्गाने म्हणजे खटकाळी बायपास- गारमाळ मार्गे अकोला बायपास- हिंगोली शहर या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
लहान चारचाकी व दुचाकीवाहनांसाठी मार्गहिंगोलीतून कळमनुरीकडे जाणाऱ्या लहान चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी नवीन रेल्वेपुलाखालून उजव्या बाजूने जिनमाता नगरातील सिमेंट रस्ता, पुढे पर्यायी कच्चा रस्त्याने रेल्वे भूयारी पुल- खटकाळी हनुमान मंदिर- खटकाळी बायपास असा मार्ग असणार आहे. तसेच कळमनुरीकडून हिंगोलीत येण्यासाठी याच मार्गाने म्हणजे खटकाळी बायपास, खटकाळी हनुमान मंदिर, रेल्वे भूयारी पूल पुढे जिनमातामार्गे शहरात येता येणार आहे.
मुख्य मार्ग या कालावधीत असणार बंदहिंगोली ते कळमनुरी मुख्य मार्ग २ ते १० नोव्हेंबर या कालावधीत बंद असणार आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा याच मार्गाने येणार असल्याने ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत रेल्वे पुलाचे काम बंद असणार आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२२ ते १० जानेवारी २०२३ या काळात मुख्य रस्ता रहद्दारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.