हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी मोठ्या प्रमाणात वादळवारे व अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह केळी, संत्री, मोसंबी आदी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यामुळे हिंगोली तालुक्यातील सवड, नर्सी नामदेव, केसापूर, घोटादेवी, राहोली, वरुड, गवळी, लोहगाव आदी गावांत अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे मोसंबी, संत्रा, आंबा, गहू, करडई, टाळकी ज्वारी व भाजीपाल्यांचे नुकसान झाले.
वसमत तालुक्यातील हयातनगर, लिंगी व इतर भागात शनिवारी गारपीट झाली. यामुळे १३ हेक्टरांवरील रब्बी पिके व फळबागा भुईसपाट झाल्या. तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. तालुक्यात केळी १ हेक्टर, ज्वारी ६ हेक्टर, गहू ३ हेक्टर, उन्हाळी सोयाबीन २ हेक्टर, आंबे १ हेक्टर असे १३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. १९ मार्च रोजी कृषी व महसूल विभागाच्या पथकाने पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात केली.
सेनगाव तालुक्यातील बहुतांश भागात शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाटाबरोबर अवकाळी पाऊसही झाला. यामुळे संत्रा, गहू, हरभरा, कांदा, टरबूज, खरबूज आदी पिकांचे नुकसान झाले. धोतरा, खडकी, हिवरखेडा, सालेगाव, बन, बरडा, कापडशिंगी यासह इतर परिसरात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला.
कळमनुरी तालुक्यात १८ मार्च रोजी सात ते आठ गावांत वादळासह गारपीट झाली. अति वेगाने वारे होते. यामुळे गहू भुईसपाट झाला. तालुक्यातील बाभळी, गौळबाजार, वाकोडी, गांगापूर, शिवनी (बु,), सेलसुरा, माळधामणी, जांभरून, उमरा आदी गावांमध्ये वादळवाऱ्यासह गारपीट झाली. या वादळवाऱ्यामुळे गहू भुईसपाट झाला. तसेच मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोथिंबीर आदी भाजीपाल्यांचेही नुकसान झाले.
औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. रविवारी तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी पिंपळदरी, जामगव्हाण, जळलादाभा या तिन्ही गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, संत्रा, टरबूज, आंबे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.