हिंगोली : येथील मोंढ्यात सोयाबीन, हळदीच्या भावात घसरण सुरू असताना तुरीने मात्र गुरूवारी दहा हजारांचा पल्ला गाठला; परंतु तुरीचे उत्पादन यंदा निम्म्याखाली आल्यामुळे भाववाढीचा फारसा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अत्यल्प पाऊस, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा खरीप पिकांना फटका बसला. सोयाबीनचे उत्पादन निम्म्याखाली आले. त्यामुळे सोयाबीनला किमान सहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळेल अशी आशा होती; मात्र सोयाबीन पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. मध्यंतरी सरासरी ४ हजार ७०० रुपये भाव मिळत असताना त्यातही आता घसरण झाली असून, १८ जानेवारी रोजी सरासरी ४ हजार ४१३ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. या दिवशी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
तर १५० क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. या दिवशी तुरीचे भाव क्विंटलमागे जवळपास ५०० ते ७०० रुपयांनी वधारले. किमान ९ हजार ५०० ते कमाल १० हजार १०० रुपयांचा भाव मिळाला; परंतु उत्पादनात झालेली घट पाहता शेतकऱ्यांना भाववाढीचा फारसा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.
तूरडाळ कडाडणार...
मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. मोंढ्यात तुरीने दहा हजारांचा पल्ला गाठला आहे. परिणामी, डाळीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या बाजारात एक किलो तूरडाळीसाठी १४० ते १६० रुपये मोजावे लागत आहेत. येणाऱ्या दिवसांत आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.
आवक अत्यल्प होत असल्याने भाववाढ...पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव, अवकाळीचा फटका यामुळे तुरीचे उत्पादन प्रचंड घटले. अनेक शेतकऱ्यांना तर डाळीपुरत्याही तुरी झाल्या नाहीत. त्यामुळे मोंढ्यात अत्यल्प आवक होत आहे. परिणामी, भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या १० हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचलेला भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे