हिंगोली: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ वसमत तालुक्यातील नहाद येथील विनायक रुस्तुम बोरगड या युवकाने रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान जवळा बाजार बसथांबा परिसरात स्वतःच्या मोटारसायकलला आग लावून निषेध व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाही दिली. या घटनेची माहिती मिळतात हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. परंतु तोपर्यंत मोटारसायकल पूर्णपणे जळाली होती. या ठिकाणी जमलेल्या युवकांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. दरम्यान, या ठिकाणी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी त्यानंतर वाहतूक सुरळीत करून दिली.