हिंगोली : येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील चार दिवसांपासून हळदीच्या दरात क्विंटलमागे पाचशे ते दीड हजार रूपयांची घसरण झाली. सरासरी १५ हजार ६५० रूपयांवर पोहोचलेल्या हळदीला शुक्रवारी सरासरी १३ हजार ८०० रूपये दर मिळाला. आठवड्याच्या तुलनेत आवकही मंदावली आहे.
येथील मार्केट यार्डात जुलैपासून हळदीचे दर वधारले. मे आणि जूनमध्ये मिळालेल्या दराच्या तुलनेत जवळपास दुप्पटीने दर वाढल्यामुळे आवक वाढली होती. ज्या शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने हळद विक्रीविना ठेवली होती. त्यांनी दर वाढताच हळद विक्री केली. तर जवळपास दहा टक्के शेतकऱ्यांकडे अजूनही हळद शिल्लक असून, त्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे.परंतु, मागील चार दिवसांत दरात पाचशे ते दीड हजार रूपयांपर्यंत घसरण झाली आहे.
दर घसरल्यामुळे आवकही मंदावत असून, सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार क्विंटलची आवक होते. परंतु, भाव घसरल्याने आवक घटत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांकडे आता हळद शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आवक वर परिणाम होत आहे.
अशी दरात घसरण...मार्केट यार्डात ४ ऑगस्ट रोजी २ हजार ५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. त्या दिवशी १४ हजार ते १७ हजार ३०० रूपये दर मिळाला होता. तर सरासरी १५ हजार ६५० रूपयाने हळदीची विक्री झाली. ७ ऑगस्टला भावात घसरण होऊन सरासरी १४ हजार ६५० रूपये भाव मिळाला. तर ८ ऑगस्टला १५ हजार ५५० रूपये, ९ ऑगस्ट रोजी सरासरी १५ हजार ३०० रूपये दर मिळाला होता. त्यानंतर मात्र हळदीच्या दरात घसरण झाली. १० ऑगस्टला १५ हजार रूपये तर ११ आणि १४ ऑगस्ट रोजी १४ हजार ४०० रूपयावर भाव आला. १७ आणि १८ ऑगस्टला १३ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळाला. पंधरवड्यात सरासरी पाचशे ते दीड हजाराने भाव घसरले आहेत.
मार्केट यार्ड तीन दिवस राहणार बंद...हळदीला यंदा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हळदीचे पैसे आठवड्यात किंवा पंधरवड्यात द्यावे लागतात. परंतु, खरेदीदारांनी कारखाना किंवा मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्री केलेल्या हळदीचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता खरेदीदारांना ही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी सोमवारपासून तीन दिवस मार्केट यार्ड बंद ठेवण्यात येणार आहे. बंद दरम्यान आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.