हिंगोली : मराठा आरक्षणासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलन सुरू असून, अंबड तालुक्यात बस पेटविल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने हिंगोली, वसमत व कळमनुरी आगारांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसफेऱ्या रद्द केल्या आहेत.
आरक्षणासाठी मराठा समाज काही जिल्ह्यात आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री बस पेटविल्याची घटना घडली. त्यानंतर एसटी महामंडळाने आगार प्रशासनास खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने आंदोलन होत असलेल्या मार्गावरील बसफेऱ्या रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार हिंगोली आगाराच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर जिंतूरपर्यंतच बस सोडण्यात येत आहे. या आगाराच्या वतीने दिवसभरात छत्रपती संभाजीनगरसाठी ७ बस सोडण्यात येतात.
सकाळपासून जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे; परंतु प्रवासी आणि बस सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे आगार व्यवस्थापक सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी सांगितले. दरम्यान, वसमत आणि कळमनुरी आगाराच्या वतीनेही जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावर पाठविण्यात आलेल्या बस जिंतूरलाच थांबविण्यात आल्याची माहिती आहे.