वसमत: तालुक्यात भूगर्भातून आवाज येत जमीन हादरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी ६:५१ मिनिटाला पुन्हा भूगर्भातून आवाज येवून सौम्य धक्का बसल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. परंतु भूकंपमापक यंत्रावर याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, या महिन्यात परिसराला हादरा बसण्याची ही दुसरी वेळ आहे. भूगर्भातून आवाज येत जमीन हादरण्याचा प्रकार आता नेहमीच होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे, आंबा, बहिरोबा चौडी, डोणवाडा, पिंप्राळा, वर्ताळा, सेलू, सुकळी, कुरुंदा यासह तालुक्यातील अनेक गावांना नेहमीच भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूगर्भातून आवाज येत जमीन केंव्हांही हादरत आहे. आज सकाळी ६.५१ वा दरम्यानाही असाच धक्का जाणवला. या महिन्यातील पहिल्या आठवड्यात ही जमीन हादरली होती. गत सहा ते सात वर्षापासून अनेक वेळा असे धक्के बसले आहेत. तालुक्यातील पांग्रा शिंदे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलल्या जात होते. याठिकाणी गत चार ते पाच वर्षांपूर्वी भूतज्ञांनी भेट देऊन पाहणी करून मातीचे नमुने घेतले होते. त्यानंतर पुन्हा कोणीही भेट दिली नाही. मात्र, हादरे बसण्याच्या संख्या वाढत असल्याने नागरीकांत भिती वाढली आहे.