लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला.हिंगोली शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या इंचा येथे पाणीटंचाईने कळस गाठला आहे. याबाबत ग्रामपंचायत व प्रशासनाला निवेदने देवूनही काहीच उपाययोजना झाली नाही. ग्रामस्थांनी शेवटी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना विचारणा केली तर तेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. तहसीलमध्ये जावूनही काहीच फरक पडला नाही. शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय राऊत, रिपाइंचे सर्कल अध्यक्ष सिद्धार्थ चक्के, ग्रामस्थ कैलास चक्के यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात महिला व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत होते. ग्रामस्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत असून गावातील पाणीप्रश्न जाणीवपूर्वक सोडविला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. सलग तीन वर्षांपासून पाणीप्रश्न गंभीर बनला. परंतु हा प्रश्न सोडविण्यासाठी ना ग्रामपंचायत पुढाकार घेतेय, ना प्रशासन. त्यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई असली तरीही प्रशासनाने एकाही बोअर अधिग्रहण केले नाही यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले होते. काही महिलांनी तर चक्क ग्रामपंचायतसमोर भांडीच आदळली. शासन विरोधी घोषणांचा पाऊस सुरू होता. गावातील चिमुकलेही सहभागी झाली होते. हा मोर्चा गावातील मुख्य मार्गावरून ग्रामपंचायतीवर धडकला. मोर्चामुळे गाव ओस पडले होते. सार्वजनिक बोअरची विद्युत मोटरही सरपंचांच्या बोअरमध्ये असल्याचे महिलांनी सांगितले. सरपंचाच्या घरी पाणी आणण्यासाठी गेल्यास अनेकदा उलट उत्तरे ऐकावयास मिळाल्याचे महिला सांगत होत्या.आश्वासनानंतर आंदोलन मागेकेवळ बॉडी बदलली म्हणून दोन वर्षांपासून माझ्या बोअरवर अधिग्रहण केले जात नाही. तसे असूनही मी ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करतो. प्रशासनाने गावापर्यंत पाईप लाईन करून दिली. तर पाणीपुरवठ्याची जबाबदारी मी घेईन, असे माजी सरपंच गोविंदराव ठाकरे यांनी सांगितले. ग्रा. पं. सदस्य घागर मोर्चा घेऊन येणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून आले. घरातील सर्व कामे सोडून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे शोभाबाई चक्के यांनी सांगितले. मोर्चेकरी बराचवेळ ग्रा. पं. समोर ताटकळत बसले होते. दोन तासानंतर प्रशासकीय अधिकारी आले अन् त्यांनी ग्रामस्थांना तुमच्या मागणीनुसार पाणी देण्याचे आश्वासन दिले.