हिंगोली : फुलधारणा झालेल्या तथा कळीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवरील किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषध फवारणी आवश्यक ठरत आहे. असे असताना खबरदारीचा उपाय म्हणून दुकानदार व नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ बंधनकारक करण्यात आल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र बंद आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून १० आॅगस्टपर्यंत २३५ दुकानदार व त्यांच्या नोकरांची टेस्ट करण्यात आली. त्यातील चारजण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत.
सुरूवातीपासूनच्या पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची वाढ जोमाने झाली आहे. सध्या सोयाबीनला फुलधारणा झाली असून बदलत्या वातावरणाचा फटका या पिकाला बसू शकतो. त्यामुळे येथून पुढचे १५ दिवस सोयाबीनची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विविध स्वरूपातील किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी रासायनिक औषध फवारणी करणे अत्यावश्यक ठरणार आहे. असे असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ६ आॅगस्टपासून १९ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू केली. यामुळे इतर दुकानांसोबतच कृषी सेवा केंद्रही बंद आहेत. संबंधित दुकानदारांनी स्वत:सोबतच दुकानात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करून घ्यावी. अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास तसे प्रमाणपत्र दुकानाच्या दर्शनी भागात लावावे. त्यानंतरच १२ आॅगस्टपासून दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
त्यानुसार, १० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी या तीन तालुक्यांमधील २३५ कृषी सेवा केंद्रांचे संचालक व त्यांच्या नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करण्यात आली. त्यात चारजण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले; मात्र उर्वरित २६५ पेक्षा अधिक दुकानदार व नोकरांची टेस्ट झालेली नव्हती. त्यामुळे सर्व ठिकाणचे कृषी सेवा केंद्र १२ आॅगस्ट रोजी सुरू होणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. अशास्थितीत खरीप हंगामातील सोयाबीनसह उडीद, मूग आणि अन्य पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढल्यास आणि वेळेवर फवारणीकरिता रासायनिक औषध उपलब्ध न झाल्यास काय करावे, या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. तथापि, प्रशासनाने ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ची गती वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.
‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र आवश्यकचयाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी चर्चा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक असलेल्या कृषी सेवा केंद्रांचे संचालक व त्यांच्या नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३५ दुकानदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून चार ‘पॉझिटिव्ह’चा अपवाद वगळता इतरांना तसे प्रमाणपत्र देण्यात आले, असे त्यांनी सांगितले.उर्वरित कृषी सेवा केंद्र संचालक व नोकरांची टेस्ट करून घेतली जात आहे. ‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकान सुरू करण्यास परवानगी नाही, असेही विजय लोखंडे यांनी सांगितले.
मूग, उडीद, सोयाबीन पिकांची सद्य:स्थितीमूग, उडीद - सुरूवातीला पेरणी केलेले मूग, उडीद हे पीक सध्या शेंगा धारणेच्या अवस्थेत असून मावा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा उपद्व्याप व वातावरणातील बदलामुळे तांबेरा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.सोयाबीन - सोयाबीन पीक फुल आणि कळीच्या अवस्थेत असून हिरवी उंटअळी आणि चक्रीभुंग्यांकडून नुकसान होण्याचे संकेत आहेत.