हिंगोली : जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांमध्ये समावेश असलेल्या सोयाबीनचा पेरा दिवसेंदिवस वाढत असून, इतर पिकांचे क्षेत्र मात्र घटत असल्याचे चित्र आहे. करडई, भुईमुगाचा पेरा तर निम्म्यापेक्षाही कमी झाला असून, वाढता उत्पादन खर्च, अपुरे पर्जन्यमान यामुळे घटलेला हा पेरा आता वाढत नसल्याचे दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी खरीप हंगामात जवस तर रब्बीत सूर्यफूल, करडई आदी पिकांच्या पेरणीचे क्षेत्र हे हजार हेक्टरच्याही पुढे होते. मात्र, दिवसेंदिवस या पिकांच्या पेऱ्यात घट होत आहे. सोयाबीन एकतर ९० दिवसात येते शिवाय इतर रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. त्यामुळे गतवर्षी सोयाबीन २.३५ लाख हेक्टरवर होते. गत खरीप हंगामात हे पीक २.८४ लाख हेक्टरवर गेले होते. सूर्यफूल ३०० हेक्टरपेक्षा जास्त असायचे. मात्र, आता ते ५० हेक्टरवर आले असून, करडई पीकसुद्धा गतवर्षीपर्यंत ७०० हेक्टरपर्यंत होते. ते आता ४०० हेक्टरपर्यंत घसरले आहे. जवस आंतरपीक म्हणून अनेक ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे पूर्वी ३०० हेक्टरपर्यंत असणारे हे पीक आता १०० हेक्टरपर्यंत आले आहे. हिंगोली जिल्ह्यात सिंचनाच्या पट्ट्यात भुईमुगाचा पेराही १ हजार हेक्टरच्या आसपास होता, तोही दिवसेंदिवस घटत आहे. जनावरांना चारा व शेंगा अशा दुहेरी बेताने हे पीक घेतले जायचे.
करडई हद्दपार, भुईमुगाचे क्षेत्रही घटतेच
जिल्ह्यात करडईचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. या पिकाचा उत्पादन खर्च जास्त असून, ते रोगालाही लवकर बळी पडते. तसेच काढणीला मजूरही मिळत नाहीत. काटेरी झाड असल्याने मजुरीही जास्त लागते. त्यामुळे हे पीक दुर्लक्षित होत आहे. तर जवस आंतरपीक म्हणून घेतले जायचे, त्याकडेही आता अनेक शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. सूर्यफुलाची पेरणी केवळ तेलासाठीच केली जायची. सोयाबीनच्या पर्यायाने ती घटली आहे तर भुईमुगाचा पेरा काही वर्षे सतत पर्जन्यमान कमी झाल्याने घटला आहे. त्यानंतर इतर पर्याय निवडलेले शेतकरी आता या पिकाकडे वळत नाहीत.
मागील काही वर्षांत जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांमध्ये समावेश असलेल्या सोयाबीनचा पेरा प्रचंड वाढला. कमी खर्च, कमी दिवसात हे पीक येते. त्यातच रोगाला कमी बळी पडते. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. तर करडई, भुईमुगाला खर्च जास्त येतो. या पिकासाठी निसर्गावरही अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र घटले आहे. मुळात या पिकांकडे यापूर्वीही शेतकऱ्यांचा तेवढा कल नव्हताच.
- विजय लोखंडे, कृषी अधीक्षक अधिकारी
ग्रामीण भागात सोयाबीन येण्यापूर्वी सूर्यफुलाच्या पेरणी क्षेत्रात सातत्य असायचे. करडई हे पीक घरच्यापुरते घेतले जायचे. आता हे पीक घेणे अवघड झाले. त्यात मर रोग आला की, पीक हातचे जाते. रोगांना लवकर बळी पडते व काढणीला मजूरही मिळत नाहीत. चांगले पर्जन्यमान झाले व वेळेत पेरणी केली तरच उन्हाळी भुईमूग हाती लागतो. त्यामुळे हे पीकही कमी होत आहे.
- तातेराव मोरे, शेतकरी